मुंबई, 28 मे (हिं.स.)।देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूची प्रकरणे वाढताना दिसत आहेत. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि राजस्थानसह राजधानी दिल्ली आणि हरियाणामध्येही कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.बुधवारी(दि. २८) सकाळपर्यंत भारतात १०४७ सक्रिय रुग्ण आढळले. महाराष्ट्रात ६६ आणि उत्तर प्रदेशात १० नवीन रुग्ण आढळले आहेत.मृतांचा आकडाही ११ वर पोहोचला आहे. देशात कोविडसाठी तयारी सुरू झाली आहे. अनेक राज्यांनी रुग्णालयांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
आरोग्य मंत्रालयाने २६ मे पर्यंतचा डेटा अपडेट केला होता. त्यात, देशात १०१० सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात ६६ नवीन रुग्ण आढळले आहेत, यांपैकी ३१ रुग्ण मुंबई शहरातील आहेत. या सर्व रुग्णांना सौम्य स्वरूपाचा कोरोना असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. येथील एकूण सक्रिय रुग्णांसंदर्भात बोलायचे झाल्यास, हा आकडा ३२५ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत १०६ रुग्ण बरे झाले आहेत. पुणे महापालिका हद्दीत १८, ठाणे महापालिका हद्दीत १२, नवी मुंबई महापालिका हद्दीत ४, पनवेल महापालिका हद्दीत ३, नागपूर महापालिका हद्दीत २, तर सांगलीमध्ये १ रुग्ण आढळला आहे. जानेवारी २०२५ पासून कोरोनासह इतर व्याधी असलेल्या ४ रुग्णांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे.महत्वाचे म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये तयारीही सुरू झाली आहे. जेजे रुग्णालयात १५ बेडचा आयसोलेशन वॉर्डही तयार करण्यात आला आहे.
राज्यात जानेवारी २०२५ पासून एकूण ८,२८२ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात पॉझिटिव्ह रुग्ण ४३५ आढळले असून मुंबईमध्ये सर्वाधिक ३२५ रुग्ण आहेत.
ताज्या आकडेवारीनुसार, केरळ (430), महाराष्ट्र (209) आणि दिल्ली (104) मध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. यासह, गुजरातमध्ये 83, कर्नाटकमध्ये 80 आणि राजस्थानमध्ये 76 सक्रिय प्रकरणे आहेत. 27 मे रोजी, भारतातील कोरोनाव्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या 1010 वर पोहोचली आहे. एका अधिकृत निवेदनानुसार, बहुतेक प्रकरणांमध्ये अतिशय सौम्य लक्षणे आढळून आली आहेत.
उत्तर प्रदेशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. २६ मे पर्यंत येथे १५ सक्रिय रुग्ण होते. हा आकडा आता १० ने वाढला आहे. गाझियाबादमध्येही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली असून १३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर एक जण रुग्णालयात दाखल आहे. गाझियाबादमध्ये ४ महिन्यांचे एक बाळही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. राज्यातील रुग्णालयांना कोरोनासंदर्भात सतर्क राहण्यास सांग आले आहे. राजस्थानमध्येही पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचे एकूण ७ नवीन रुग्ण आढून आले आहेत. जोधपूरमध्येही रुग्ण आढळून आले आहे. येथे एका नवजात बाळासह अनेक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.