जयपूर, 13 ऑगस्ट – राजस्थानातील दौसा जिल्ह्यात खातू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप ट्रकला ट्रेलरची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ७ मुले आणि ४ महिलांसह ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जयपूर आणि स्थानिक रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. मृत सर्वजण उत्तर प्रदेशातील एटाह जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
दौसा एसपींच्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे ३:३० ते ४ वाजण्याच्या सुमारास झाला. पिकअप आणि ट्रेलरच्या धडकेनंतर काही जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी देवेंद्र कुमार यांनी सांगितले की, ११ मृतांची पुष्टी झाली असून ८ जणांना पुढील उपचारासाठी जयपूर पाठविण्यात आले आहे, तर ४ जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत जिल्हा प्रशासनाला जखमींवर त्वरित व योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले. त्यांनी मृतांच्या आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करत जखमींच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा दिल्या.