सोलापूर, 27 मे : सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या तीन दिवसांत तब्बल 12 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यात 45 वर्षांत पहिल्यांदाच उजनी धरण ‘प्लस’ पातळीत पोहोचले आहे, ही एक ऐतिहासिक बाब मानली जात आहे.
उजनी धरणाची पातळी उणे २३ टक्क्यांवरून ‘प्लस’मध्ये
२१ मे रोजी उजनी धरणातील पातळी उणे २३ टक्क्यांवर गेली होती. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे पातळी वेगाने वाढून २७ मे रोजी ‘प्लस’मध्ये पोहोचली आहे. यामध्ये दौंड तालुक्यातून येणाऱ्या पाण्याचा १९ हजार क्युसेक्स आणि धरण परिसरातील पावसाचा ११ हजार क्युसेक्स विसर्ग महत्त्वाचा ठरला आहे.
भीषण उन्हाळ्यानंतर दिलासा
गेल्या महिन्यातील कडक उन्हामुळे शेतकऱ्यांसाठी सलग ६० दिवस दोन आवर्तने धरणातून सोडावी लागली होती. याशिवाय सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीत पाणी सोडण्यात आले होते. परिणामी, १८ एप्रिल रोजी उजनी धरणाची पातळी ऐतिहासिक नीचांकी पातळीवर म्हणजेच उणे पातळीत गेली होती.
धरण प्रशासनाचे अंदाज चुकीचा ठरला
धरणातील पातळी मे अखेरीस उणे ५० टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्र, अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे हा अंदाज चुकीचा ठरला आणि उजनी धरणाने इतिहास घडवला.