पालघर, २८ ऑगस्ट. विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या इमारत दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्यातून २४ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) आणि वसई-विरार महापालिका अग्निशमन दलाकडून अद्यापही बचावकार्य सुरू आहे.
रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग अचानक कोसळल्याने अनेक कुटुंबे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. सुरुवातीला जेसीबी पोहोचण्यात अडथळे आले, मात्र दुपारनंतर शेजारील चाळी खाली करून मार्ग मोकळा करण्यात आला आणि बचाव कार्याला गती मिळाली.
मृतांची नावे…
आरोही जोविल (२४), उत्कर्षा जोविल (१), लक्ष्मण किसकू सिंग (२६), दिनेश सकपाळ (४३), सुप्रिया निवळकर (३८), अर्नव निवळकर (११), पार्वती सकपाळ (६०), दिपेश सोनी (४१), सचिन नेवाळकर (४०), हरिश सिंग बिष्ट (३४), सोनाली तेजाम (४०), दिपक बोहरा (२५), कशिश सहेनी (३५), शुभांगी सहेनी (४०), गोविंद रावत (२८).
जखमींची नावे…
प्रभाकर शिंदे (५७), प्रमिला शिंदे (५०), प्रेरणा शिंदे (२०), प्रदीप कदम (४०), जयश्री कदम (३३), मिताली परमार (२८), संजय सिंग (२४), मंथन शिंदे (१९), विशाखा जोविल (२४). यापैकी दोन जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उर्वरितांवर वसई-विरारमधील शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वसई-विरार पालिकेचे अधिकारी, पोलिस अधिकारी व अग्निशमन दलाशी संवाद साधत आवश्यक त्या सूचना दिल्या. “बचावकार्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे त्यांनी नातेवाईकांना आश्वासन दिले. अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, संजय हेरवाडे, प्रांताधिकारी शेखर घाडगे, पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.