अमरावती, 19 मे (हिं.स.)
गेल्या दोन दिवसात वादळ आणि अवकाळी पावसामुळे धारणी तालुक्यात दाणादाण उडाली असून जनजीवन अस्त-व्यस्त झालेले आहे. रविवारी दुनी गावातील ज्ञानमंदिर माध्यमिक शाळा व नानासाहेब भिसे कनिष्ठ महाविद्यालय तथा चाकर्दा येथील शाळेची टिन उडाल्याने दोन जण जखमी झाले.
धारणी, दुनी, चाकर्दा, तलईसह अनेक गावात घरांची पडझड झालेली आहे. तर १७० पेक्षा अधिक गावांची विज बंद पडलेली आहे. झापल गावात दौन बैलांचा मृत्यू झाला. दुनी फाट्यावरील बसस्टँड कोसळले असून दादरामध्ये स्वस्त धान्याच्या दुकानातील ८० क्विंटल धान्य ओले झाले.
धारणी तालुक्यातील गेल्या दोन दिवसात
वादळी पावसामुळे दादरा, हिराबंबई, दुनी, चाकर्दा, सुसर्दा, तलई, धुळघाटरोड गावात प्रकृतीने कहरच केलेला असून अनेक पाळीव प्राणी मेले तर पन्नास पेक्षा जास्त घरांची पडझड झाली. दुनी गावातील ज्ञान मंदिर शाळेचे टिनपत्रे उडाले तर विनोद गोसावी व अमृत धुर्वे जखमी झाले. याशिवाय दुनी फाट्यावरील बसस्टॅड पूर्णपणे कोसळले, धारणीत सोलरचे पॅनलचे स्टैंड पोस्ट धाराशाही असले तर अनेक घरांची टिनपत्रे उडाली.
अनेक गावात विजेचे खांब कोसळले
नविन सुरू असलेल्या बांधकामाची भिंत पडली. धुळघाट रोड गाव शिवारातील शेतीत मुगाचे कापून ठेवलेले पिक खराब झाले. दादरा येथील अनेक घरांची पडझड झाली. तर स्वस्त धान्य दुकानदार केरासिंग चौहानच्या दुकानात ठेवलेले ८० क्विंटल स्वस्त धान्य पाण्याने ओले झाले. अनेक गावात विजेचे खांब पडल्यामुळे दुपारी साडेतीन पासून विजेचा पुरवठा बंद पडलेला आहे.
१७० गावात अंधारअनेक गावात उन्हाळी मुगाच्या पिकाला नुकसान झाले. धारणी तालुक्यातील हिराबंबई, सुसर्दा, दुनी, चाकर्दा, तलई कॅम्प, दादरा, धुळघाट रोड, झापल सर्वाधिक प्रभावित झालेले आहेत. महावितरणच्या धारणी विभागातील १७० गावांमध्ये अंधार पसरलेले आहे. तात्काळ पंचनामे करून नुकसानीचा अंदाज घेण्याची मागणी आहे. झापल गावातील सोहनच्या शेतातील दोन बैलांवर विज पडल्याने दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
वरूड तालुक्यात वादळी पावसाचे थैमान
रविवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास अचानक शहरात वादळी पावसाला सुरुवात झाली. यामुळे अनेकांचे दुकानांचे फलक, घरावरील टिनाचे छप्पर उडाले. स्थानिक ओम मोटर्समध्ये मेकॅनिक वाहन दुरुस्त करीत असताना अचानक वादळी पावसात निंबाचे झाड तेथे उभ्या करण्यात आलेल्या कारवर कोसळले. यावेळी नशीब बलवत्तर म्हणून मेकॅनिक वाचला. मात्र, कारचे सात ते आठ लाखांचे नुकसान झाले. येथे तीन कार झाडाखाली दबल्या गेल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोरही निंबाचे झाड कोसळले. जवळच प्रवासी निवारा असल्याने दहा ते पंधरा लोक तेथे आश्रयाला होते. लिंबू सरबतच्या वाहनावर झाड कोसळले. तथापि, नागरिकांनी भीतीने वाट मिळेल तिकडे पळ काढून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.
