सोलापूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे व कवी फुलचंद नागटिळक प्रतिष्ठान खैराव यांच्या संयुक्त विद्यमाने 13 व 14 फेब्रुवारी रोजी बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे 17 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलन स्थळाला डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार राजा माने हे आहेत. तर उद्घाटन 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शरद गोरे हे उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाचे निमंत्रक शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, स्वागताध्यक्ष आमदार राजेंद्र राऊत, सहस्वागताध्यक्ष शोभा घुटे पाटील, कार्याध्यक्ष नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, आयोजक फुलचंद नागटिळक, कार्यवाहक महारुद्र जाधव हे आहेत.
या संमेलनाचा प्रारंभ 13 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता भगवंत मंदिर येथून ग्रंथदिंडीने होणार आहे. ग्रंथदिंडीचे उद्घान ह.भ.प. डॉ.अनंत बिडवे महाराज, ग्रंथपूजन ह.भ.प. विलास जगदाळे यांच्या हस्ते होणार आहे.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन दुपारी चार वाजता राहुल जगदाळे निर्मित डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे या लघुपट प्रदर्शनाने होणार आहे. श्रीपाद सबनीस यांच्या हस्ते होणार असून राजा माने अध्यक्षस्थानी आहे. स्वागताध्यक्ष आमदार राजेंद्र राऊत, निमंत्रक बी वाय यादव, कार्याध्यक्ष असिफभाई तांबोळी, शरद गोरे, खासदार ओमराजे निंबाळकर, डॉ. प्रकाश बुरगुटे, धनाजी साठे, संतोष ठोंबरे, सोमेश्वर घाणेगावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या वेळी ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता कवी फुलचंद नागटिळक यांचा नटसम्राट हा एकपात्री प्रयोग होणार आहे. याचे उद्घाटक अमर देवकर हे आहेत. यावेळी लोककला व इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
रविवारी सकाळी 9 वाजता कविसंमेलन होणार आहे. यात संजय बैरागी अध्यक्ष आहेत जुगलकिशोर तिवाडी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
दुपारी अकरा वाजता उद्योजक मनोज कदम यांची प्रकट मुलाखत होणार आहे. मुलाखतकार मुंबई आकाशवाणीचे निवृत्त कार्यक्रम अधिकारी महादेव जगदाळे हे आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून राजे लखुजी जाधव यांचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधव, राजेंद्र मिरगणे, सुभाष शेवाळे, दादासाहेब साठे, अमोल विष्णू गरड, बापूसाहेब कदम उपस्थित राहणार आहेत.
रविवारी दुपारी 12 वाजता अनिल गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. दुपारी दोन वाजता कृषी साहित्य व शेतकऱ्याचे प्रदर्शन या विषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाचे अध्यक्ष कॉ. तानाजी ठोंबरे आहेत. दुपारी तीन वाजता प्रकाश गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली बार्शीकरांचे कविसंमेलन होणार आहे. सायंकाळी साडेचार वाजता पुरस्कार वितरण व समारोप सोहळा डॉ. श्रीकांत मोरे, माजी मंत्री दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे आमदार, तानाजी सावंत, अभिजित धराशिवकर हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी डॉ. व. न. इंगळे, डॉ. चंद्रकांत मोरे, डॉ. भारती रेवडकर, डॉ. राजेंद्र दास, मुकुंदराज कुलकर्णी, शब्बीर मुलानी, पां.न. निपाणीकर, रामचंद्र इकारे या बार्शीकरासमवेत सीमा भागातील साहित्यिक डॉ. गोपाल महामुनी, ज्येष्ठ साहित्यिक अजित सगळे, ज्येष्ठ साहित्यिक चारुदत्त कासार यांचा सन्मान होणार आहे. तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या मंगल बांगर, माधुरी सुनिता उकिरडे, मातृभूमी प्रतिष्ठान, राजमाता इंदुमती आंदळकर अन्नछत्रालय, संभाजी घाडगे, शेळके, उमेश काळे, इंगळे यांचा गौरव होणार आहे.