बर्लिन, 24 मे, (हिं.स.)। जर्मनीतील हॅम्बुर्ग
शहरातल्या मुख्य रेल्वे स्थानकावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात १८ जण जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी काही
प्रवाशांना ट्रेनमध्येच प्राथमिक उपचार देण्यात आले. हल्ल्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
ही घटना हॅम्बुर्गच्या
सेंट्रल स्टेशनवर प्लॅटफॉर्म १३
आणि १४ दरम्यान घडली. या वेळी एक
गाडी प्लॅटफॉर्मवर उभी होती. या प्रकरणी पोलिसांनी ३९ वर्षीय जर्मन महिलेला घटनास्थळावरुन अटक केली असून तिची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
पोलिस प्रवक्ते फ्लोरियन अब्बेन्सेथ यांनी सांगितले की, आरोपीने एकटीने
हा हल्ला केला असावा आणि तिच्या कृतीमागे राजकीय उद्देश नाही, असे पोलिसांना
वाटते. ती मानसिक
तणावाच्या अवस्थेत असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या घटनेनंतर चार प्लॅटफॉर्म
बंद करण्यात आले असून, काही गाड्या उशीराने किंवा वळवून चालवल्या जात आहेत. हॅम्बुर्ग
सेंट्रल स्टेशन हे जर्मनीतील
सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे, जिथे दररोज सुमारे५.५ लाख
प्रवासी ये-जा करतात.
जर्मनीचे चान्सेलर फ्रेडरिक मर्झ यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत हल्ल्याला “धक्कादायक”
म्हटले आहे आणि आपत्कालीन
सेवांमधील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेबद्दल आभार मानले.
