सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कालपासून 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत.
सोलापूर येथे सध्या कोरोनाचे 3978 रुग्ण आढळून आले असून 344 जणांचा बळी गेला आहे. तर 2076 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे. सोलापूरसह नाशिक, जळगाव, औरंगाबाद येथे सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून पुन्हा लॉकडाऊनचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत.
उद्या जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार नगरसेविका आणि अधिकाऱ्यांसोबत ते जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी बैठक घेतील असं सांगण्यात येत आहे. दरम्यान सोलापूर शहरात 10 दिवसांचा लॉकडाऊन असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, असं आवाहन सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केलं आहे.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात प्रशासनाने केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी पवार सोलापुरात येत आहेत. पवारांच्या दौऱ्याची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करू, असे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी सांगितले.