मुंबई : भारताच्या अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचे आज कोरोना विषाणूमुळे निधन झाले आहे. भारताचे पॅरा बॅडमिंटनपटू रमेश टिकाराम यांचे आज शुक्रवारी करोनामुळे निधन झाले आहे. २९ जूनला त्यांना ताप आल्यामुळे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. आज अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश यांच्या पश्ताच पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.
काही दिवसांपूर्वी रमेश यांना ताप आणि खोकला आला होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी झाली होती, यामध्ये ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात केले, पण आज शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
रमेश यांनी एक खेळाडू म्हणून जगभरात चांगले नाव कमावले होते. त्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे त्यांना भारताचे शात्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती असताना त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. भारतामध्ये २००१ साली पॅरा बॅडमिंटन स्पर्धा भरवण्यात आली होती. ही स्पर्धा भरवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
रमेश यांचे निधन झाल्याची बातमी भारताच्या पॅरा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष एन. सी. सुधीर यांनी दिली आहे. याबाबत सुधीर म्हणाले की, ” भारताचे दिग्गज पॅरा बॅडमिंटन खेळाडू रमेश टिकाराम यांचे आज कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. ही बातमी तुम्हाला सांगताना मला फार वाईट वाटत आहे.”