उस्मानाबाद : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रात कोवीड – 19 टेस्टींग लॅबच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. आयसीएमआरची मान्यता मिळाल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसात या टेस्टींग लॅबमध्ये स्वॅब टेस्टींगचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे जिल्हावासियांना ही एक दिलासा देणारी बातमी आहे.
सध्या जिह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शेजारील प्रत्येक जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तेथील स्थानिक लॅबवर ताण पडत असल्याने तसेच जिह्यात कोविड टेस्टींग लॅब नसल्याने स्वॅब तपासणीसाठी बराच वेळ लागत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात सुक्ष्मजीवशास्त्र विभाग असून या ठिकाणी सुसज्ज प्रयोगशाळाही आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात कोरोना टेस्टींग लॅब सुरु झाल्याने उस्मानाबाद येथील विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्या पुढाकाराने येथील उपकेंद्रात कोविड – 19 टेस्टींग लॅब सुरु करण्यास जिल्हाधिका-यांनी मान्यता देवून लॅब उभारणीचे काम सुरु केले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्र तसेच जिह्यातील इतर संस्थांच्या मदतीने सुमारे 1 कोटी खर्च करुन ही लॅब सध्या पूर्ण तयार झाली आहे. काल शनिवारी येथील विद्यापीठ उपकेंद्रातील कोविड – 19 लॅबला लातूर येथील लॅबमधून डमी सँपल देण्यात आले. येथील लॅबमध्ये या सँपलची टेस्ट करण्यात येणार असून त्याची लातूर येथील लॅबच्या वतीने तपासणी करण्यात येणार आहे. सर्व रिपोर्ट योग्य असल्यास उस्मानाबाद येथील कोविड – 19 लॅबला आयसीएमआरची मान्यता मिळणार आहे आणि त्यानंतर लगेच येथील लॅबमधून जिह्यातील संशयित कोरोना रुग्णांची स्वॅब टेस्ट करण्यात येणार आहे. येथील कोविड – 19 टेस्टींग लॅबमध्ये दिवसाला 200 स्वॅब टेस्ट करण्याची क्षमता आहे.
* संजय निंबाळकर यांचा सिंहाचा वाटा
संजय निंबाळकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्राच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. तसेच जिह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून मागील अडीच महिन्यापासून विद्यापीठ उपकेंद्रातील कोविड – 19 टेस्टींग लॅब सुरु होण्यासाठी त्यांनी स्वतः ला वाहून घेतले आहे. टेस्टींग लॅब उभारणीपासून यासाठी लागणारी सर्व यंत्रणा, निधी उभा करणे, प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या विविध परवानग्यासाठी ते सतत पाठपुरावा करत असतात.
* उस्मानाबाद नगर परिषदेचेही मोलाचे सहकार्य
उस्मानाबाद शहरातील विद्यापीठ उपकेंद्रात उभारण्यात आलेल्या कोविड – 19 टेस्टींग लॅबसाठी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मदत करण्यात आली आहे. या लॅबसाठी नगर परिषदेच्या वतीने हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन आणि इनर्व्हटरची व्यवस्था केली आहे.
येथील कोविड – 19 टेस्टींग लॅबसाठी लागणाऱ्या सर्व तंत्रज्ञाचे लातूर तसेच औरंगाबाद येथील कोविड टेस्टींग लॅबमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांचे सर्व प्रशिक्षण पूर्ण झाले असून या तंत्रज्ञामार्फत येथील विद्यापीठ उपकेंद्रातील कोविड – 19 टेस्टींग लॅबमध्ये सँपलचे टेस्टींग करण्यात येणार आहे.