मनाली– बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलं. घराणेशाहीवर अजूनही मोठ्या प्रमाणात वाद होत आहेत. सुशांतच्या निधनानंतर सर्वातआधी कंगनाने यी मुद्द्यावर आपलं मत मांडलं होतं. सुशांत बॉलिवूडमधील गटबाजी आणि घराणेशाहीचा शिकार झाला आहे. एवढंच नाही तर सुशांतची ही आत्महत्या नसून ठरवून केलेली हत्या आहे, असंही कंगना म्हणाली होती.
कंगनाने सुशांतच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी आणि गटबाजी करणाऱ्यांवर थेट आरोप केले होते. तसेच त्या व्यक्तींबद्दल ती जे बोलले ते कंगना सिद्ध करू शकले नाही तर पद्मश्री पुरस्कार परत करण्याची तयारीही तिने दाखवली. कंगना म्हणाली की, ती जे काही बोलली ते आधीच प्रसिद्ध झालेलं आहे आणि ती हे पुन्हा सिद्धही करून दाखवेल. कंगनाला याच वर्षी भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानीत केले आहे. आपलं म्हणणे सिद्ध न झाल्यास पद्मश्रीही परत करण्याची तयारी कंगनाने दर्शविली आहे.
यानंतर सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी येत होती. कंगनाने आपल्या वक्तव्यात सिनेसृष्टीतील काही बड्या नावांचा उल्लेखही केला होता. मात्र यानंतरही कंगनाला पोलिसांकडून कोणतेही प्रश्न विचारण्यात आले नाहीत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, सुशांतच्या केस संदर्भात चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी समन पाठवला होता. पण सध्या मी मनालीमध्ये आहे आणि मुंबईत जाऊ शकत नाही. तसेच तिचा जबाब नोंदवून घेण्यासाठी मुंबईवरून मनालीला कोणाला पाठवण्याचा सल्लाही दिला. मात्र यावर पोलिसांकडून कोणतंही उत्तर आलं नाही.