सांगली : जिल्ह्यातील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये 22 जुलै रोजीच्या रात्री 10 वाजल्यापासून ते 30 जुलै अखेर लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात उर्वरित ग्रामीण भागातील जनतेने उत्स्फूर्तपणे स्वयंशिस्तीने जनता कर्फ्यू पाळावा. लॉकडाऊन व जनता कर्फ्यू या दोन्हींमध्ये जनतेने संपूर्ण सहकार्य द्यावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी आदि उपस्थित होते.
कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या मर्यादीत ठेवण्यात यश आले आहे. प्रशासनाने केलेल्या अंमलबजावणीचे व त्यास लोकांनी दिलेल्या सहकार्याचे हे यश आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या यापुढेही मर्यादीत रहावी यासाठी 22 जुलै रोजीच्या रात्री 10 वाजल्यापासून ते 30 जुलै अखेरपर्यंत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये संपूर्ण लॉकडाऊन व उर्वरित ग्रामीण भागात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.