श्रीनगर : कोरोना व्हायरस महामारीमुळे यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. पूर्वी १० दिवस ही यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने यंदाची अमरनाथ यात्रा आज घेण्यात आलेल्या बैठकीत रद्द करण्यात आली आहे. यावर्षी होणारी अमरनाथ यात्रा धोक्यात असल्याने त्यापार्श्वभूमीवर सैन्यानेही देखील माहिती दिली आहे.
यावर्षी अमरनाथ तीर्थयात्रा २३ जूनपासून सुरू होणार होती, परंतु लॉकडाऊनमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. २१ जुलै रोजी यात्रा सुरू होणार होती, पण जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यात्रेसंदर्भात निर्णय घेणाऱ्या श्री अमरनाथ श्राईन बोर्डने आज मंगळवारी बैठक घेवून त्यावर अंतिम निर्णय घेतला.
या निर्णयामुळे अखेरीस वार्षिक तीर्थयात्रेच्या भोवतालचे अनुमान थांबले आहे.
दरम्यान, यात्रा रद्द झाली असली तरी भाविकांसाठी सकाळ व संध्याकाळच्या आरतीचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल. “धार्मिक भावना जिवंत ठेवण्यासाठी मंडळ सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीचे थेट प्रक्षेपण आणि आभासी दर्शन चालू ठेवेल. पूर्वीच्या प्रथेप्रमाणे पारंपरिक विधी पार पाडले जातील.
दरवर्षी हजारोंच्या संख्येत भाविक अमरनाथ यंत्राला जातात. जून महिन्यात अमरनाथ श्राईन बोर्ड या यात्रेचे आयोजन करते, तर एप्रिल महिन्यात यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु होते. पण, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही नोंदणी प्रक्रिया सुरु होऊ शकली नाही. दुसरीकडे, मागील वर्षी सुरक्षेच्या कारणास्तव ही यात्रा रद्द करण्यात आली होती. अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी देशासह परदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक येतात.