बार्शी : बार्शी तालुक्यात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील सर्व औषध विक्रेते व खासगी डॉक्टर यांना पोलिसांनी नोटिसा बजाविल्या आहेत. याव्दारे कोरोनासदृश्य लक्षणे असणार्या रुग्णांची माहिती प्रशासनास कळविण्याचे बंधन घातले आहे. याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी मध्यंतरी बार्शीतील लॉकडाऊनची पाहणी केल्यानंतर दिलेल्या आदेशानुुसार सीआरपीसी व बीपी अधिनियमातील तरतुदीनुसार या नोटीसा बजाविण्यात आल्या असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली आहे.
शहरातील काही औषध विक्रेते, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय परस्पर औषध विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. डॉक्टरांच्या परस्पर ऐकिव माहितीवरुन स्वत:वर औषध उपचार करुन प्रकृती अत्यंत बिघडल्यानंतर काही रुग्ण दवाखान्यात धाव घेत असल्याचे आढळून आले आहे. शेवटच्या टप्प्यातील हे रुग्ण उपचारासाठी आल्यानंतर दवाखान्यांचाही नाईलाज होत आहे. त्यामुळे प्रशासनालाही आता कठोर भूमिका घ्यावी लागत आहे
या नोटीसीनुसार, शहरातील डॉक्टरांनी कोरोनासदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्या रुग्णाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमाकांची माहिती अरोग्य विभागाला कळविणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे औषध विक्रेत्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध विक्रीस मनाई करण्यात आली आहे. कोरोनासदृश्य लक्षणे असणार्यांना औषधे दिली गेली असल्यास या रुग्णांची नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकासह माहिती कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.