तिरुवनंतपुरम : केरळमध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. तर सोशल डिस्टन्सिग नियमांचा भंग केल्याप्रकरणी ६०० विद्यार्थ्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
केरळमध्ये अभियांत्रिकी, वास्तुस्थापत्य (आर्किटेक्चर), वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला उपस्थित असलेला एक १७ वर्षीय विद्यार्थी आज बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला. तर काल मंगळवारीही दोन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. दरम्यान, केरळ पोलिसांनी परीक्षेला बसलेल्या ६०० विद्यार्थ्यांच्या पालकांविरोधात सोशल डिस्टन्सिगच्या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन अनेक राज्यांनी शैक्षणिक वर्षही उशिरानं सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक असल्यानं राज्य सरकारनं ऑनलाईन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास सुरूवात केली आहे.