नाशिक : देशात कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे संसदेचं कामकाज पुढे ढकलण्यात आलं होतं. अखेर बुधवारी संसदेचं कामकाज सुरू झालं. राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी आज शपथ घेतली. त्यात महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शपथ घेतली.
शरद पवार हे दिल्लीत खासदारकीची शपथ घेत असताना मात्र नाशिक शहरात त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. भारतीय युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करत शरद पवार यांनी राम मंदिरावरून केलेल्या वक्तव्याचा तिव्र निषेध करण्यात आला.
राम मंदिर उभारल्याने कोरोना जाईल का, असं मत शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सोलापुरात व्यक्त केलं होतं. एवढंच नाही तर शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला होता. शरद पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्री राम.. चलो अयोध्या’ अशा आशयाचे पत्र पाठवलं आहे.
अयोध्येतल्या ऐतिहासिक राम मंदिराचं भूमीपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमीपूजन केलं जाणार आहे. पंतप्रधानांनी राम मंदिर ट्रस्टचं निमंत्रण स्विकारलं आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राम मंदिर भूमीपूजनाच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर खोचक टीका केली होती.