नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारताला एक सुवर्णपदक मिळाले आहे. सध्याच्या घडीला सर्व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या स्थगित करण्यात आलेल्या आहे. काही स्पर्धा रद्द तर काही पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या काळात भारतीय संघ कसे काय सुवर्णपदक जिंकू शकते, हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. पण भारताला आज एक सुवर्णपदक मिळाल्याचे दिसत आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा ही २०१८ साली खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत भारताने १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ कांस्यपदकांची कमाई केली होती. भारताने या स्पर्धेत ४ बाय ४०० या रीले प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. या स्पर्धेत बेहरिनने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. पण बेहरिनच्या संघातील केमी अँडेकोया ही उत्तेजन सेवन चाचणीमध्ये दोषी आढळली आहे. त्यामुळे आता बेहरिनचे सुवर्णपदक काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे भारताच्या रौप्यपदकाचे रुपांतर आता सुवर्णपदकामध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे. या सुवर्णपदकामुळे भारताच्या खेळाडूंचे ऑलिम्पिकसाठी मनोबल उंचावू शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळे भारताकडून आता रौप्यपदक मागवण्यात येणार असून खेळाडूंच्या हातामध्ये काही दिवसांमध्येच सुवर्णपदक पाहायला मिळणार आहे.
भारताच्या या संघात जगप्रसिद्ध धावपटू हिमा दासचाही सहभाग होता. हिमाबरोबर भारतीय संघात मोहम्मद अनास, पुवम्मा आणि अरोकिया राजीव यांचा समावेश होता. त्यामुळे आता या चारही भारताच्या धावपटूंना सुवर्णपदक दिले जाणार आहे. त्यामुळे भारताच्या एकूण अॅथलेटीक्समधील पदकांची संख्या आता २० वर येऊन ठेपली आहे.
याबाबत भारताच्या अॅथलेटीक्स संघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी सांगितले की, ” आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यामध्ये आता आठ सुवर्णपदकांचा समावेश झाला आहे. भारताच्या अॅथलेटीक्स पदकांची संख्या आता एकूण २० वर गेली आहे. या सुवर्णपदकाचा नक्कीच भारताच्या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी तयारी करताना फायदा होणार आहे.”
दोन वर्षांपूर्वीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय मिश्र रिले संघाने सुवर्णपदक जिंकले असल्याची घोषणा अखेर करण्यात आली आहे. बहारिनची धावपटू केमी अदेकोया हा उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यामुळे मिश्र रिले संघाच्या रौप्यपदकाचे सुवर्णपदकात रूपांतर झाले. तसेच अनू राघवन हिला 400 मीटर अडथळा शर्यतीतील ब्रॉंझपदक मिळणार आहे.
* हुकलेले सुवर्णपदक असे मिळाले
मोहम्मद अनास, एम. आर. पूवाम्मा, हिमा दास, अरोकिया राजीव यांनी चार बाय 400 मीटरच्या मिश्र रिले शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. त्या वेळी त्यांनी 3 मिनीट 15.17 सेकंद अशी वेळ दिली होती. मात्र या शर्यतीत बहारिनची ओलुवाकेमी अदेकोया ही हिमा धावत असताना तिच्यासमोर पडली होती. त्यामुळे भारताचे सुवर्णपदक हुकले, असा भारताचा दावा होता. प्रत्यक्षात हिमा त्यानंतर पडल्यामुळे कझाकस्तानने भारताविरुद्ध तक्रार केली आणि त्या वेळी हिमाची चूक नव्हती. यासाठीच भारतास संघर्ष करावा लागला होता. मात्र आता अखेर भारतास हे सुवर्णपदक मिळाले आहे. आता ओलुवाकेमी अदेकोया ही उत्तेजक चाचणीत दोषी ठरली आहे. मूळची नायजेरियाची असलेली, पण बहारिनकडून खेळणारी ओलुवाकेमी अदेकोया ही केमी अदेकोया या नावानेही ओळखली जाते.