सोलापूर : खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेल्या कैद्याला बोकडाचे मटण खाण्यासाठी त्याच्या घरी घेवून गेल्याप्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी गुरुवारी मंगळवेढा पोलीस ठाण्यास भेट दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांनीच ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
ही बाब ‘सुराज्य डिजिटल‘ ने पहिल्यादा उघड करताच गुरुवारी सकाळी पोलिस अधीक्षक अतुल शेंडे यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात धाव घेतली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पोलीस कर्मचारी माने व ढोणे यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आल्याची माहिती सायंकाळी त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक बजरंग माने व उदय ढोणे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. मंगळवेढा येथील सबजेलमध्ये अटक असलेला खूनाच्या गुन्ह्यातील कैदी तानाजी भोसले याला 17 जुलै रोजी पोलीस कर्मचारी माने व ढोणे यांनी तो आजारी असल्याने त्याला उपचार करण्यासाठी म्हणून सब जेलमधून बाहेर काढले होते. त्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्याऐवजी आंबे तालुका पंढरपूर येथील त्याच्या घरी नेले. त्याठिकाणी मित्रमंडळी व नातेवाईकांसोबत कैदी आणि दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी बोकडाच्या मटणावर यथेच्छ ताव मारला. त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले.
दरम्यान मंगळवेढा सबजेलमधील २८ कैदी कोरोना बाधित झाले असून त्यामध्ये तानाजी भोसले याचाही समावेश आहे. कोरोनामुळे ही बाब उघड झाल्यानंतर कैदी भोसले याच्या घरी खळबळ माजली. त्यादिवशी म्हसोबाची बोकड खाण्यासाठी आलेल्या नातेवाईक आणि मित्र मंडळींची घाबरगुंडी उडाली.
* दोन तासाचा कालावधी गेला कुठे?
या तपासासाठी डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांनी सी.डी.आर.ची मदत घेवून घटनेचा छडा लावला. ग्रामीण रुग्णालयात आरोपीला दुपारी 2.24 वा. नेल्याचे चौकशीत आढळले. सबजेलमधून ग्रामीण रुग्णालयात जाण्यास केवळ 5 मिनीटाचा कालावधी लागत असताना 2 तासाच्या कालावधीत कुठे गेले असा संशय आल्याने या घटनेचे बिंग फुटले. पोलिस अधिकार्यांनी आरोपी जेलच्या बाहेर काढल्यापासून ते आरोपीला जेलमध्ये आणून ठेवण्यापर्यंत संपूर्ण कागदपत्रे व पुरावे तपासल्यानंतर या घटनेचे गुढ उकलले.
* बडतर्फीसारखी कारवाईची शक्यता
अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी ही घटना गंभीर असून प्राथमिक कारवाई म्हणून त्या दोघांना सेवेतून निलंबित करीत आहोत, भविष्यात बडतर्फीसारखी कारवाई करण्याची शक्यताही वर्तवून असे खात्याला बदनाम करणारे पोलिस ठेवणे उपयोगाचे नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, कारागृहातून तीन आरोपी पळून जाण्याचा प्रकार घडला. या घटनेची चौकशी सुरु आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर जे दोषी कर्मचारी आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे झेंडे यांनी सांगितले.