नवी दिल्ली : राज्यसभेत शपथविधी झालेल्या ४२ सह ६५ खासदारांना संसदीय समित्यांचे वाटप करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते व माजी संरक्षणमंत्री शरद पवार हे संरक्षणविषयक समितीचे सदस्य असतील. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या समितीचे अध्यक्ष म्हणून भाजपचे डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांनी याबाबतची घोषणा केली. २१ संसदीय समित्यांमध्ये राज्यसभेच्या ६५ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील काही समित्यांमधील वरिष्ठ सभागृहाच्या जागा रिक्त होत्या. महाराष्ट्रातील सातपैकी फौजिया खान वगळता सहा खासदारांनी काल शपथ घेतली. रामदास आठवले हे केंद्रात मंत्री असल्याने त्यांना नियमानुसार संसदीय समितीमध्ये घेता येत नाही.
संरक्षण समितीत पवार यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील राजीव सातव यांनाही स्थान मिळाले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हेही याच समितीत आहेत.भाजपचे उदयनराजे भोसले यांना रेल्वे समिती मिळाली आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनाही रेल्वे समितीतच सदस्यत्व देण्यात आले आहे. प्रियांका चतुर्वेदी यांना वाणिज्य तर, भागवत कराड यांना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या समितीचे सदस्यत्व मिळाले आहे.
उपसभापती हरिवंश यांना कृषी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना कोळसा व खाण या समित्यांचे सदस्यत्व मिळाले आहे. मध्यप्रदेशात सातत्याने आमने-सामने असलेले काँग्रेसचे दिग्विजयसिंग आणि भाजपचे ज्योतिरादित्य शिंदे हे दोघेही मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्याच समितीत आहेत.