पंढरपूर : पंढरपूर येथील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वसाहतीच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात मुंबईत वरिष्ठ अधिका-यांसोबत तातडीने बैठक घेवून हा प्रश्न कायम स्वरुपी सोडवला जाईल, असे आश्वासन राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज दिले.
शिवसेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी पोलिस वसाहती संदर्भातील मागणीचे लेखी निवेदन गृहमंत्री देसाई यांना दिले. त्यावेळी मंत्री शंभूराजे देसाई यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.
तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर आणि टेलिग्रामवरही उपलब्ध
गृह राज्यमंत्री देसाई आज करमाळा तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी पंढरपूर विभागातील विविध मागण्यांचे लेखी निवेदन दिले.
यावेळी आमदार शहाजीबापू पाटील,पंढरपूर शिवसेनेचे शहर प्रमुख रवि मुळे,युवा सेना शहर समन्वयक अमित गायकवाड,युवा सेना तालुका उपप्रमुख रणजित कदम आदी उपस्थित होते.
* प्रस्ताव लालफितीत पडून
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पोलिसांची संख्या आहे. पंढरपूर येथे पोलिस कर्मचाऱ्यांची जुनी वसाहत आहे. सध्या वसाहतीमधील घरे जीर्ण झाली आहेत. येथे नवीन वसाहत उभारण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करुन तो पाठवला आहे. परंतु तो अद्याप लाल फितीमध्ये पडून आहे.
पोलिस वसाहतीचा प्रश्न तातडीने सोडविण्यासंदर्भात आज संभाजी शिंदे यांनी गृहमंत्री देसाई यांच्याशी चर्चा केली. या शिवाय भाळवणी (ता.पंढरपूर) येथे पोलिस औट पोस्ट सुरु करण्याची ही मागणी केली आहे. याबाबत तातडीने माहिती घेवून यावरही कारवाई केली, जाईल असेही मंत्री देसाई यांनी आश्वासन दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.