सोलापूर : सोलापूर शहरात आज आलेल्या अहवालात चौघांचा मृत्यू तर 96 नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शास्ञी नगरातील एका वृद्धास दाखल करुन घेतल्याने वेळेत उपचार न मिळाल्याने शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. याबाबत आता चौकशीचा फॉर्स चालू झाला आहे.
आजच्या अहवालात चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये होटगी रोडवरील स्वामी विवेकानंद नगरातील 72 वर्षीय पुरुषाचा, अक्कलकोट रोडवरील व्यंकटेश नगरातील 70 वर्षीय महिलेचा, स्वागत नगरातील 70 वर्षीय महिलेचा, तर लष्कर परिसरातील गांधी नगरातील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
(तुमचा आवडता सुराज्य डिजिटल फेसबुकपेज, ट्वीटर आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
शहरातील एकूण 25 हजार 194 व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये आतापर्यंत 4 हजार 401 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत शहरातील 442 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
* वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
शासकीय रुग्णालयात वेळेवर उपचारासाठी दाखल न करून घेतल्याने शास्त्री नगर येथील एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओपीडीमध्ये या व्यक्तीची तपासणी केली, मात्र रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही व्यक्ती सिव्हिलच्या ओपीडीमध्येच बसून होती. सोबत कोणीच नव्हते. या व्यक्तीला या ठिकाणी श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने मृत्यू झाला. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी यासंदर्भात सिव्हिल अधिष्ठातांकडून अहवाल मागवला आहे. कोविड नियंत्रण १९ कक्षाचे प्रमुख धनराज पांडे यांना शुक्रवारी यासंदर्भात सिव्हिलची तपासणी करण्यासाठी पाठवून दिले. हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
“सिव्हिलमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्याने शास्त्री नगरातील रुग्ण दगावल्याचे महापालिकेच्या आरोग्य कर्मचा-यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात सिव्हिलच्या अधिष्ठातांना पत्र पाठवले आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाचा अहवालही मागवून घेणार आहोत”
– पी. शिवशंकर, आयुक्त, महापालिका