सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या उपाययोजनाबाबत लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने समन्वयाने नियोजन करावे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निधीची कमतरता नसल्याची ग्वाही वित्त व नियोजन, गृह, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. गृहराज्यमंञ्यांनी कोरोना आढावा बैठक करमाळा तालुक्यात घेतली.
करमाळा येथे गृह, वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत मंञी देसाई बोलत होते. यावेळी आमदार संजय शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ उपस्थित होते.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
मंञी देसाई म्हणाले, लॉकडाऊन संपल्यानंतर रुग्णसंख्या वाढू नये यासाठी समन्वयाने योग्य नियोजन करा. मृत्यूदर वाढू देऊ नका, रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार करा. नवीन आयसीयूच्या १२० बेडचे काम जलदगतीने करा. रुग्णालयातील पदभरती त्वरित करा, यासाठी वॉक इन इंटरव्ह्यू घ्या. कोविड सोडून इतर रुग्णांसाठी खाजगी डॉक्टरच्या सेवा घ्या. पीपीए किट आणि औषधांचा पुरवठा सुरळित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी श्री शंभरकर यांनी जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनेच्या स्थितीची माहिती दिली. शहर व जिल्ह्यात अँटीजेन चाचण्या वाढविल्या असून यामुळे रुग्णसंख्या त्वरित माहिती होत आहे, मृत्यूदर ११ टक्क्यांवरून ५.७ टक्क्यांवर आला असल्याचे सांगितले.उ
त्पादन शुल्क विभागाने महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. लॉकडाऊन काळात दारू दुकाने चालू ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कौशल्य विकास विभागाकडून नर्सिंग स्टाफ भरण्याचा प्रयत्न करा, ऑनलाईन रोजगार मेळाव्यात १५३ जणांना रोजगार मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.
पणनबाबत मका खरेदी केंद्र करमाळा तालुक्यात सुरु असून शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ देऊ नका. त्यांना हमीभाव देऊन माल खरेदी करा. जिथे तूर, हरभरा खरेदी केंद्र नसतील तर ते सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असताना त्यांच्या जनावरांच्या चारा व पाण्याची सोय करणाऱ्या, उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिसांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
* जिल्ह्यात 43 पोलिसांना कोरोनाची लागण
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात १० हजार गाड्या जप्त केल्या तर मास्क नसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. ग्राम समिती आणि कोरोना वॉरीरियर्सच्या मदतीने गावोगावी पोलीस यंत्रणा काम करीत आहे. ४३ पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातून काहीजण बरे झाले, सध्या १८ जण उपचार घेत असल्याची माहिती बैठकीत दिली.