सोलापूर : लॉकडाऊन संपल्यावर पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी शहरातील सर्वच भागात कामासाठी बाहेर पडणार्यांची गर्दी झाली. किराणा, भाजीसह बँका आणि इतर व्यवहार सुरू झाल्याने नागरिकांची जागोजागी वर्दळ वाढलेली दिसून आली. जणू काही नागरिक 10 दिवसांचा लॉकडाऊन कधी संपतोय, याचीच वाट पहात असल्याचे चित्र शहरात दिसून आले.
सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर महापालिकेकडून 17 ते 26 जुलै दहा दिवसांचा कडक लॉकडाउन लागू करण्यात आला होता. रविवारी रात्री बारा वाजता हा लॉकडाउन मागे घेण्यात आला. त्याचबरोबरच काही अटींवर महापालिकेकडून दुकाने, कार्यालय सुरू करण्यास परवानगी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध
शहरातील नवीपेठ, बाळीवेस, आसरा, सत्तरफूट रोड, पार्क चौक, लक्ष्मी मार्केट, एसटी स्टँड परिसरासह अनेक भागात नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. सोमवारी भाजी मंडई, किरणा दुकान आणि बँका सुरू असल्याने या ठिकाणीही नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. पहिल्या दिवशी केवळ भाजी आणि किराणा दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र सर्रास सर्वच ठिकाणी इतर दुकानेही उघडण्यात आली होती. हॉटेल आणि चहा कँटीनला मंगळवारपासून परवानगी देण्यात आली असता सोमवारी सकाळपासूनच हॉटेलमधून पार्सल सेवा सुरू होती.
* नागरिकांनी घेतली दक्षता
लॉकडाऊन संपल्यानंतर पहिल्याच दिवशी नागरिक घराबाहेर पडले. यावेळी मात्र त्यांनी दक्षता घेतल्याचे दिसून आले. जवळपास सर्वच नागरिकांनी तोंडावर मास्क लावले होते. याशिवाय अनेकजण सॅनिटायझरच्या बाटल्याही खिशात घेऊन फिरताना दिसून आले.
* विविध ठिकाणी पोलिसांची कारवाई
शहरात दुचाकीवर फक्त एकास तर रिक्षामध्ये दोघांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र हा नियम मोडणार्यांवर पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. होटगी नाका, सात रस्ता, पार्क चौक, स्टेशन परिसरासह सर्वत्र पोलिसांनी नियम मोडणार्यांवर कारवाई करून दंड वसूल केला.