जालना : महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत शासन रुग्णालयांना पीपीई किट देत आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत सेवा देणाऱ्या खासगी रुग्णालयांना पीपीई किटचे बिल आकारता येणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
आरोग्यमंञी टोपे म्हणाले, की जनआरोग्य योजनेअंतर्गत राज्यात विविध खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ८० टक्के राखीव खाटा ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या ठिकाणी उपचार घेतलेल्या रुग्णांच्या बिलात पीपीई किटची रक्कम आकारल्याचे प्रकार पुढे आले आहेत. शासनच पीपीई किट उपलब्ध करून देत असल्याने यापुढे या योजनेअंतर्गत त्याचे बिल रुग्णालयांना आकारता येणार नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम‘वरही उपलब्ध
काही रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने बिले देण्याची प्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अशा रुग्णालयांत शासनाच्या ऑडिटरमार्फत बिलाची तपासणी झाल्यानंतर ते नातेवाइकांना दिले जाणार आहे. त्यामुळे अशा तक्रारींना आळा बसेल, असेही टोपे यांनी सांगितले.