पाटणा : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाने आज वेगळेच वळण घेतले. मुंबई पोलीस या प्रकरणी हॉट प्रोफाईल लोकांची चौकशी करत असताना तिकडे सुशांतच्या वडिलांनी त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीच्या विरोधात पाटण्यात तक्रार दाखल केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्तक्षेपानंतर ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रियाने सुशांतकडून पैसे घेतले होते व तिने संपूर्ण कुटुंबाशी असलेले त्याचे संबंध तोडून टाकले होते. इतकेच नव्हे, तर तिनेच त्याला आत्महत्येला प्रवृत्त केले असा आरोप सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे. मुंबई पोलिसांच्या तपासावर आपला विश्वास नसल्याने आपण पाटण्यात तक्रार दाखल करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सुशांत याने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 39 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे.
* रियामुळेच मानसिक विकार
सुशांतला २०१९ मध्ये कोणाताही मानसिक विकार नव्हता. रियाच्या संपर्कात तो आल्यानंतर त्याला मानसिक विकार जडले. त्याच्यावरील मानसिक उपचारासाठी कुटुंबीयांपैकी कोणाचीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. या सर्व प्रकरणात त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टरही सहभागी असावेत. त्यांनी माझ्या मुलाला कोणती औषधे दिली याची चौकशी व्हावी.
* आर्थिक व्यवहाराचाही आरोप
माझ्या मुलाच्या खात्यात १७ कोटी होते. यातील १५ कोटी रुपये त्याच्याशी निगडित नसलेल्या व्यक्तींच्या खात्यात वर्ग झाल्याचे बँक स्टेटमेंटमधून समोर आले आहे. रियाने तिच्या कुटुंबीयांना यातील किती पैसे दिले याची चौकशी व्हावी. सुशांतला आधी चांगले चित्रपट मिळत होते. रिया त्याच्या जीवनात आल्यानंतर त्याला चित्रपट मिळणे बंद झाले. याचीही चौकशी करण्याची गरज आहे. रियाने त्याच्यावरील मानसिक उपचार जगजाहीर करण्याची धमकी दिली होती. रिया आणि तिचे नातेवाईक माझेही सुशांतशी बोलणेही होऊ देत नव्हते. रिया आणि तिच्या नातेवाईकांनी षडयंत्र करुन माझ्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे के.के.सिंह यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.