सांगली : पुरेसी जमीन नसताना बेकायदेशीरपणे बँके कर्ज देऊन परत कर्जमाफी योजनेत नावही घुसडून गैरप्रकार केल्या प्रकरणी कर्जदार शेतकरी, सेवा संस्थेचा सचिव, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निरीक्षक, याच्यावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची टाकवे तालुका शिराळा येथे शाखा आहे. टाकवे येथील श्री भैरवनाथ विकास सेवा सहकारी संस्थेतून कर्जदार खातेदार अमरसिंह बाबुराव यवतकर याने शेत जमीन अस्तित्वात नसताना हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे.
जमीन नसतानाही त्याने कर्ज मागणी अर्ज व कागदपत्रे दाखल करून 70 हजार रुपयांचे अल्पमुदत पीक कर्ज उचलले होते. सदर कर्जाची शिफारस करण्याची जबाबदारी तत्कालीन भैरवनाथ सेवा संस्थेचे सचिव संजय शामराव पाटील व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बँक निरीक्षक बाबासाहेब नथुजी घोडे यांची असतानाही जाणून-बुजून अमरसिंह यवतकर यास या दोघांनीही मदत केलेली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अमरसिंह यवतकरचे नावे पुरेसे क्षेत्र नसतानाही अपेक्षित अहवाल सचिव व बँक निरीक्षकाने सादर केला होता. त्यास कर्ज मिळण्यास मदतही केली. कालांतराने सदरचे कर्ज थकबाकीत गेल्याने पुन्हा कर्जमाफी योजनेत अमरसिंह यवतकरचे नाव संगनमताने घुसडण्यात आले. त्याचाही त्यांनी लाभ घेतला.
सदरचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर उपलेखापरीक्षक सहकारी संस्था मत्स्य सांगली, यांनी कर्जदार अमरसिंह बाबुराव यवतकर (रा. टाकवे) बँकेचे निरीक्षक बाबासाहेब नथुजी घोडे, व संस्थेचे सचिव संजय शामराव पाटील याच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विशाल पाटील व पोलीस उपनिरीक्षक वाडेकर करत आहेत