मुंबई : सुशांतसिंहचे वडिल कृष्णा किशोर राजपूत यांनी रियाविरोधात बिहार पोलिसांत सात पानी एफआयआर दाखल केली आहे. त्यात त्यांनी रियावर गंभीर आरोप केले आहेत. रियाविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे विशेष पथक मुंबईला तपासासाठी पोहोचले. मात्र रियाची चौकशी करायला गेलेल्या पोलिसांना रिया भेटलीच नाही. ती घरात नसल्याने पोलिसांना खाली हात परत जावं लागलं.
सुशांतच्या वडिलांनी रियासोबतच तिचे कुटुंबीय इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती व शौविक चक्रवर्ती यांच्याविरोधात देखील गंभीर आरोप केले आहेत. ‘मे 2019 पर्यंत माझ्या मुलाच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित सुरू होते. मात्र त्यानंतर ही रिया चक्रवर्ती नावाची तरुणी त्याच्या आयुष्यात आली व तिथून त्याची वाताहत सुरू झाली. रिया व तिच्या कुटुंबीयांनी मिळून माझ्या मुलाला लुटल आहे. तिने सुशांतने मेहनतीने कमावलेले कोट्यवधी रुपये लुटले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रिया व तिचे कुटुंबीय सुशांतच्या प्रत्येक गोष्टीत दखल द्यायचे. रिया माझ्या मुलासोबत त्याच्या घरी राहायला आली. त्यानंतर तिने त्याला या घरात भुताटकी असल्याचे सांगितले व त्याला ते घर सोडायला लावले. तो पहिला प्रघात माझ्या मुलावर झाला. तो एअरपोर्ट जवळील एका रिसॉर्टमध्ये राहू लागला. तसेच ते सतत माझ्या मुलाला सांगायचे की तो काहीतरी विचित्र बरळत असतो. त्यामुळे त्याला डॉक्टरची गरज आहे. त्यावेळी माझी मुलगी सुशांतला पाटणाला घेऊन येण्यासाठी मुंबईला गेली होती. त्यावेळी देखील रियाच्या कुटुंबीयांनी आडकाठी आणत सुशांतला येऊ दिले नाही’, असे त्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.
रिया सुशांतला औषधांचा ओव्हरडोस द्यायची असा आरोपही कृष्णा राजपूत यांनी केला आहे. ‘रियाने सुशांतला डेंग्यू झाला असे सांगून त्याच्यावर औषधांचा भडिमार केला होता. खरंतर त्याला डेंग्यू झाला नव्हता. तिने पूर्णपणे त्याच्यावर कंट्रोल मिळवला होता. त्याचा फोनही रिया किंवा तिच्या कुटुंबीयांकडे असायचा. आम्हालाही त्याच्याशी बोलू दिले जायचे नाही. त्यांनी त्याचा फोन नंबरही बदलला होता. त्यामुळे आमचं त्याच्याशी बोलणंही कमी झालं होतं. एकदा त्याच्याशी बोलताना त्याने मला सांगितले की ही लोकं मला मेंटल रुग्णालयामध्ये भरती करतील. खरंतर माझ्या मुलाला चित्रपटसृष्टी सोडून कुर्गमध्ये सेटल व्हायचे होते. तिथे तो शेती करणार होता. त्याचा मित्र महेशही त्याच्यासोबत जाणार होता. मात्र रियाला हे कळाल्यानंतर तिने त्याला धमक्या द्यायला सुरुवात केली.
त्याचे मेडिकल रिपोर्ट मीडियाला दाखवून त्याला वेडं ठरवेन असं तिने त्याला धमकावले. तिच्या सततच्या धमक्यांना व त्रासाला सुशांत वैतागला होता. पण सुशांत आपले काहीच ऐकत नाही हे जेव्हा रियाला समजले ती 8 जून 2020 ला त्याला सोडून निघून गेली. जाताना तिने त्याच्या घरातील रोकड, लॅपटॉप, दागिणे, त्याचे क्रेडिट कार्ड देखील चोरले. त्यानंतर त्याला ब्लॉक केलं. त्यावेळी सुशांतने माझ्या मुलीला फोन करून सांगितले की रिया मला कुठल्याही प्रकरणात फसवू शकते. त्याच्या दुसऱ्याच दिवसी सुशांतची एक्स मॅनेजर दिशाने आत्महत्या केली. दिशाला देखील रियानेच सुशांतची मॅनेजर म्हणून ठेवले होते. तिच्या आत्महत्येनंतर सुशांत घाबरला होता. म्हणून माझी मुलगी त्याच्यासोबत तीन ते चार दिवस राहिली त्यानंतर तो शांत झाल्यावर ती परतली. मात्र त्यानंतर काही दिवसातच सुशांतने आत्महत्या केली’, असे आरोप कृष्णा राजपूत यांनी केले आहेत.
* खात्यातील 15 कोटी गेले कुठे
सुशांतच्या खात्यात 17 कोटी होते. त्यातील 15 कोटी विविध खात्यांत ट्रान्स्फर केले आहेत. ते कोणत्या खात्यात गेले आहेत याचा पोलिसांनीतपास करावा असे त्याच्या वडिलांनी या एफआयआरमध्ये म्हटले आहे.