अयोध्या : भूमिपूजन कार्यक्रमापूर्वीच अयोध्येत दिवाळीसारखे वातावरण तयार झाले आहे. 1 ऑगस्टनंतर वेगवेगळ्या भागात असंख्य दीप प्रज्वलित करण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून यासंबंधी विशेष तयारी केली जात आहे. भूमिपूजन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून करण्यात येणार असल्याने श्रीरामभक्तांनी अयोध्येत येऊ नये, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.
सध्या अयोध्यानगरी रामनामाच्या भक्तिसागरात तल्लीन झाली आहे. अयोध्येत येत्या 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. यासाठी अयोध्येत सर्वत्र मोठ्या प्रमाणात जोरदार तयारी सुरु आहे. अयोध्येतील प्रत्येक गल्ली, प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक भिंतीची रंगरंगोटी करण्याचे काम चालू आहे तसेच भूमिपूजनादिवशी प्रभू रामाला नवीन पोशाख घालण्यात येणार असून त्याचीदेखील तयारी करण्यात आली आहे.
त्याचदरम्यान, राम मंदिराच्या पूजेसाठी अयोध्येत लाडू नैवेद्य आणि प्रसाद म्हणून वाटण्यासाठी मणिराम दास यांच्या छावणीकडून तब्बल एक लाख 11 हजार लाडू तयार केले जात आहेत. हे लाडू स्टीलच्या डब्यात पॅक करण्यात येत आहेत. भूमिपूजनादिवशी प्रभू रामांना नैवेद्य दाखवल्यानंतर हे लाडू सर्व अयोध्येत आणि इतर तीर्थ क्षेत्रात प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचे येत्या ५ ऑगस्ट रोजी साडे ११ वाजता भूमीपूजन करतील. या भूमीपूजनाची जय्यत तयारी अयोध्येत सध्या सुरु आहे. अयोध्येत 500 वर्षांनी येणाऱ्या या दिवसाला एक विशेष दिवस बनवण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून दिवाळीसारखे वातावरण तयार करण्यात येत आहे. तर दुसरीकडे दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा आणि बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दरम्यान, राम मंदिराच्या निर्माणासाठी भूमीपूजनावेळी चांदीची वीट देखील तयार करण्यात आली आहे.त्यासोबतच प्रभू राम आणि त्यांची भावंडे लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्ताने रत्नजडित कपडे घालण्यात येणार आहेत. प्रभू रामाला त्यादिवशी हिरव्या रंगाचा पोशाख घालण्यात येईल, कारण भूमीपूजन बुधवारी होणार असून त्यादिवशी हिरवा रंग शुभ मानला जातो, असं कपडे शिवणाऱ्या भगवत प्रसाद यांनी सांगितले आहे.
पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच 5 ऑगस्टला रामनगरी अयोध्येत येणार आहे. 1 अथवा 2 ऑगस्टला पंतप्रधानांचे एसपीजी कमांडो तसेच त्यांचे अधिकारी अयोध्येत पोहोचतील. यापूर्वी एटीएस, एसटीएफ, सर्विलान्स, सायबर सेल, गुप्तचर विभाग तसेच स्थानिक एलआययू पथकांना तैनात केले आहे.
* सोनेचांदीसह दानाचा ओघ सुरुच
श्री रामभक्तांकडून मोठ्या प्रमाणात दानाचा ओघ सुरू झाला आहे. सोने, चांदीच्या विटा तसेच मौल्यवान दागिन्यांचे मोठ्या प्रमाणात दान भाविकांनी दिले आहे. अतिविशिष्ठ व्यक्तीच्या सुरक्षेत तैनात केंद्रीय पोलिसदलाकडून त्यामुळे आता या दानाची सुरक्षा केली जात आहे. मंदिरासाठी श्रीरामभक्तांकडून सोने, चांदीच्या विटा पाठवण्यात येत आहेत. मौल्यवान दागिन्यांची भेट ही मोठ्या प्रमाणात न्यासाकडे जमा केली जात आहे. भूमिपूजनाची तारीख निश्चित होताच दानाचा ओघ अधिक वाढल्याने दान भंडार मौल्यवान वस्तूंनी भरले आहे.
* श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासाचे आवाहन
श्रीरामभक्तांच्या या उत्साहामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात दान स्वरुपात मिळालेले सोने, चांदीचा मंदिर बांधणीत कसा उपयोग करता येईल? असा प्रश्न न्यासातील सदस्यांना सतावत आहे. मंदिर बांधणीसाठी पैशांची आवश्यकता आहे. त्यामुळे भक्तांनी सोने, चांदी, दागिन्यांऐवजी आर्थिक मदत करण्याचे आवाहन न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे केले.