बार्शी : बार्शी तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी 66 ने वाढ झाली असून त्यामधील 61 शहरामधील आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 949 वर पोहचली आहे. बार्शी तालुक्याने दुर्दैवाने कोरोना अहवालात जिल्ह्यातील दहा तालुक्यांना मागे टाकले आहे.
949 पैकी शहरामधील रुग्ण 533 असून ग्रामीण मधील 416 आहेत. यातील दिलासादायक बाब म्हणजे उपचारानंतर डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ही 478 वर गेली असून त्यापैकी शहरातील 241 तर ग्रामीणमधील 237 आहेत. शहरमध्ये एकूण 15 आणि ग्रामीण मध्ये 17 असे एकूण 32 रुग्ण मयत झाले आहेत. बार्शी शहरामध्ये शुक्रवारी 61 रुग्णांची वाढ झाली असून त्यामानाने ग्रामीण मध्ये फक्त 5 रुग्णच वाढले आहेत.
आज प्राप्त झालेल्या एकूण 109 अहवालांपैकी निम्म्यापेक्षा जास्त म्हणजेच 66 अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यासाठी धोक्याची घंटा पुन्हा जोरात खणखणू लागली आहे. पंधरा दिवसाचे लॉकडाऊन आणि त्यासोबतच शहराच्या मध्यवर्ती भागात घोषित करण्यात आलेले प्रतिबंधात्मक क्षेत्र यामुळे शहरातील नागरिकांत मोठा रोष निर्माण झालेला असतानाच शहरात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आजपर्यंत आढळून आलेल्या बाधित रुग्णाच्या अनुषंगाने शहरामध्ये एकूण 138 प्रतिबंधात्मक क्षेत्र तर ग्रामीण मध्ये 52 तयार करण्यात आले आहेत. या क्षेत्रांवर पोलिस आणि नगरपालिका व ग्रामपंचायतीच्यावतीने करडी नजर ठेवली जात असून विनाकारण क्षेत्राबाहेर फिरणार्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
स्वॅब चाचणीच्या आज शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, बार्शी शहरातील नाळे प्लॉट 5, झाडबुके मैदान 9, लहुजी चौक 7, सुभाष नगर 2, वाणी प्लॉट 3, आडवा रस्ता 5, म्हाडा कॉलनी 1, भवानी पेठ 3, आशा टॉकिज रस्ता 7, मंगळवार पेठ 3, भिमनगर 1, कसबा पेठ 1, मार्केट यार्ड 4, मनगिरे मळा 6, रामभाऊ पवार चौक 1, रोडगा रस्ता 1, कासारवाडी रस्ता 1, सावळे चाळ 1 असे 61 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
तर ग्रामीण मध्ये वैराग 2, आगळगाव 1, सासुरे 1, रुई 1 असे एकूण 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.