बार्शी : बार्शी तालुक्यातील गोरगरीब लोकांना उपाशी ठेवून, त्यांच्या तोंडाचा घास पळवून, रेशन दुकानातून काळाबाजारात नेलेला 33 लाख रुपयांचा 110 टन तांदूळ (2 हजार 220 पोती) पनवेल पोलिसांनी पकडला.
याप्रकरणी बार्शी बाजार समितीतील वादग्रस्त व्यापारी भिमाशंकर खाडे यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह तिघांविरोधात नवी मुंबईतील भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या गुन्ह्याची माहिती बार्शीत कळताच महसूल अधिकारी, रेशन दुकानदार यांचे धाबे दणाणले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनामुळे सर्वत्र नाकेबंदी आणि संचारबंदी असतानाही रेशन दुकानातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर तांदूळ गोळा करुन तो सर्व अडथळे पार करुन मुंबईपर्यंत पोहचल्यामुळे जिल्हा प्रशासनाची मोठी नाचक्की झाली आहे.
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांची उपासमार होवू नये यासाठी सरकारने अत्यल्प किंमतीत आणि मोफत अशा दोन प्रकारचा मोठा अन्नसाठा रेशन दुकानांना पुरविला आहे. मात्र प्रशासनाशी संगनमत करुन नेहमीप्रमाणे रेशन दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात धान्यसाठा काळाबाजारात पुरविला आहे. बार्शी येथून चार कंटेनरमध्ये भरुन हा तांदूळ पनवेल येथे नेण्यात आला. तेथील एका गोदामात हा साठा ठेवण्यात आला होता.
स्थानिक पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी महसूल अधिकार्यांना सोबत घेवून गोदामावर छापा मारला असता हा काळाबाजार उघडकीस आला. याबाबत भीमाशंकर रंगनाथ खाडे, इकबाल काझी, लक्ष्मण चंद्र पटेल या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे पनवेल पोलिस अधिक चौकशी करत आहेत.