सोलापूर : एक लाखाच्या कर्जाच्या बदल्यात पाच वर्षात 17 लाख रूपये घेऊनही आणखी पैशाची मागणी करत महापालिकेत काम करणार्या मजुराला ठार मारण्याची धमकी देणार्या सावकारास सदर बझार पोलिसांनी अटक केली आहे.
बजरंग प्रल्हाद आवताडे (वय 56, रा. निराळे वस्ती, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 13 पासबूक जप्त केले आहेत. याप्रकरणी नागनाथ वाल्मिकी नाईकवाडी (वय 55 रा. फारेस्ट, न्यू तिर्हेगाव) यांनी फिर्याद दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महापालिकेत मजुरी करणारे नागनाथ वाल्मिकी नाईकवाडी (वय 55) हे फॉरेस्ट परिसरातील सादक अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांनी 2008 मध्ये खासगी सावकार आवताडे याच्याकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले. त्यानंतर नाईकवाडी यांनी डिसेंबर 2013 पर्यंत ते पैसे टप्प्याटप्याने व्याजासह फेडले. मात्र, त्यानंतर जानेवारी 2014 मध्ये आवताडे याने त्यांना आणखी एक लाख 60 हजारांची मागणी केली.
रक्कम परतफेड केली, असे म्हणताच आवताडे याने नाईकवाडी यांना शिवीगाळ करीत पत्नी व मुलींना जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हापासून आजतागायत आवताडे याने नाईकवाडी यांचे बँक पासबूक, स्टॅम्प स्वत:जवळ ठेवून घेतले. दरमहा पगार झाल्यानंतर आवताडे हा त्यांच्या बँकेतून 12 हजार रुपये काढून घेत होता. या प्रकरणी सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास स.पो.नि. संजय राठोड करीत आहेत. आवताडेकडून शहरातील किती लोकांनी पैसे घेतले आणि तो किती लोकांना त्रास देत आहे, याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.