ठाणे : भिवंडी येथील राहनाळ भागात शुक्रवारी रात्री 42 वर्षीय महिलेवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
माँटी कैलास वरटे (वय-25), विशाल कैलास वरटे (वय-23), कुमार डकू राठोड (वय-25), अनिल कुमार शाम बिहारी गुप्ता (वय-28) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन भावांसह एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून, चारही आरोपी भिवंडी परिसरातच राहतात. आरोपी 23 ते 28 वर्षे वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यातील दोन भावांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भिवंडी परिसरात पीडित महिला राहते. ती शुक्रवारी सायंकाळी काही कामानिमित्ताने मैत्रिणीच्या घरी गेली होती. तेथील काम आटपून रात्री घरी परतत असताना राहनाळ येथील एका बोगद्याजवळील निर्जनस्थळी माँटी, विशाल, कुमार, अनिल आणि त्यांचा एक सहकारी मद्यप्राशन करत होते. या पाच जणांनी तिला शस्त्राचा धाक दाखवून जंगल परिसरात नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.
दुसऱ्या दिवशी काही नागरिकांना पीडित महिला बेशुद्ध अवस्थेत या ठिकाणी आढळून आली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांना अटक करण्यात आली असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे.