माढा : माढा शहरात मंगळवारी एकूण 35 जणांची रॅपिड अॅटिजन टेस्ट केल्यानंतर 34 जण निगेटिव्ह तर एक जण पाॅझीटीव्ह आल्याने माढेकराना आज काहीसा दिलासा मिळाला आहे. माञ वाढत्या कोरोना संसर्गामुळे जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूत खबरदारीचा उपाय म्हणून बँकाही बंद राहणार आहेत.
माढा तहसील कार्यालयातील एक अधिकारी कुर्डूवाडी येथे बाधित आढळून आल्याने तहसील कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण होते. बुधवारी दुपारनंतर तहसील कार्यालयाचे सर्व कामकाज बंद करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले. संपर्कातील व्यक्तीची अॅटिजन टेस्ट ही करण्यात आली. दरम्यान केलेल्या टेस्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांनी निश्वास टाकला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माढा शहरात बुधवारपासून जनता कर्फ्यु सुरू असून पाॅझीटीव्ह व्यक्तींच्या संपर्कातील काहीजण बँकांमध्ये जाऊन आल्याचे कळाल्याने बँकिंग क्षेत्रातही भीतीचे वातावरण पसरले आहे. माढा नगरपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आजपासून बँकांनी पण प्रत्यक्ष ग्राहक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीयकृत बँकांनाही कोरोनाच्या काळात स्थानिक प्रशासनाला सहकार्याच्या भूमिकेतून कामकाज करण्याच्या सूचना आहेत. यामुळे सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आवाहन करतानाच सर्वच बँकेच्या एटीएम सुविधा पूर्ण क्षमतेनिशी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
एखादा बाधित रूग्ण बँकेत आलाच तर यामुळे अनेकजणांना धोका होऊ शकतो. यामुळे ग्राहकांनी काही दिवस ऑनलाईन सुविधांचा लाभ घेऊन कोरोनासाखळी तोडण्यास सहकार्य करण्याचे, आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.