पुणे : महाराष्ट्रातील कोरोना विषाणूमुळे लावलेले लॉकडाऊन हटविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 10 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा, नाहीतर रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुकानांची सम – विषम पद्धत कधी बंद करणार? छोटे दुकानदार, हातावर पोट असलेले कामगार यांची उपासमार होत आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना दोन महिने पगार नाही? सार्वजनिक वाहतूक कधी सुरू होणार? सरकार हे स्पष्टपणे सांगणार नसेल तर १० ऑगस्टनंतर आम्ही कधीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यात पावसानं धुमाकुळ घातला आहे. या महिन्यात १५ दिवस पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात येतंय अनेक ठिकाणी पूर-परिस्थिती निर्माण झालीये. त्यामुळं फक्त करोना-करोना म्हणत बसू नका, पुराच्या संबंधित काय उपाययोजना केल्या आहेत त्याचं उत्तर द्या?, असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
हॉटस्पॉटमध्ये या वर्षाच्या तुलनेने गेल्यावर्षी अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात गेल्या वर्षी मे महिन्यात ४ हजार ००७ मृत्यू झाले तर, यावर्षी मे महिन्यात १ हजार ६०५ मृत्यू झाले आहेत. तर, मुंबईत ३,०४६ मृत्यू झाले, तर यावर्षी २,८६० मृत्यूंची नोंद झाली, ही आकडेवारी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून मिळाली असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला.
* लोकांचा नेता होऊन दाखवावे
जातीचा मोठा नेता कोणीही होऊ शकतो. धर्माचा नेताही होऊ शकतो. मात्र,उध्दव ठाकरे यांनी आता लोकांचा नेता होऊन दाखवावं असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आता निर्णय घ्यायला शिकावे, असा टोलाही त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत लगावला