टेंभुर्णी : अखेर टेंभुर्णीत कोरोनाचा शिरकाव झाला असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक नर्स आणि फार्मासिस्ट अशा दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. यामुळे शहरात खळबळ माजली आहे. प्रशासनाकडून दोघांचे संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरु केले आहे.
आज प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर,नर्स, अशावर्कर तसेच काही खाजगी डॉक्टरांसह ३९ जणांचे ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील टेंभुर्णीत राहायला असणारी एक नर्स आणि माढ्यातून येऊन जाऊन करणारा एक फार्मासिस्ट अशा दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मागील चार महिन्यांपासून शहराच्या आसपासच्या गावात कोरोनाचे रुग्ण टेंभुर्णीत उपचार घेत होते. त्यावेळेसही अनेक जणांच्या तपासण्या केल्या होत्या. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
परंतु आज टेंभुर्णीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सतत रूग्णांची उपचारासाठी तर प्रवासाच्या पाससाठी लागणारा दाखला घेण्यासाठी वर्दळ असते. आज शुक्रवार असल्याने लहान बालकांना विविध प्रकारच्या लस देण्यासाठी बालकांसह मातांचीही गर्दी झाली होती. फार्मासिस्ट पॉझीटीव्ह आल्याने केंद्रात उपचार घेण्यासाठी औषध गोळ्या घेण्यासाठी आलेल्या संपर्कात आलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरवासियांनी विनाकारण गर्दी करु नये व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे अवाहन करण्यात आले आहे.