वेळापूर : पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या मायलेकरांना मालवाहू ट्रकने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवारी पहाटे ६.३० वाजता बोंडले (ता.माळशिरस) येथे घडली.
घटनेची फिर्याद प्रत्यक्षदर्शी प्रल्हाद देवराव जाधव यांनी वेळापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली असून जखमी मुलावर वेळापूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. माधुरी नवनाथ देशमुख (वय ३५ वर्षे रा.विखळे जि. सातारा) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. या आपल्या दोन मुलांसह काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी बोंडले येथे धनाजी लक्ष्मण जाधव यांंच्याकडे आल्या होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज पहाटे नेहमीप्रमाणे मुलगा श्रीजय नवनाथ देशमुख (वय ११ वर्षे) याच्यासह मॉर्निंगवॉकसाठी पुणे पंढरपूर पालखीमार्गावर गेल्या होत्या. दोघे वेळापूरच्या दिशेने घरापासून चारशे मीटर दूरवर जात असतानाच पाठीमागून येणार्या मालवाहतूक ट्रकने (एम.एच.२५ यू ६९९९) त्या दोघांना धडक दिली असता ट्रकखाली चिरडल्याने माधुरी देशमुख यांचा जागेवरच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. अशा अवस्थेत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रकचालकाने तेथून केले.
मयत माधुरी देशमुख यांचे वेळापूर येथे शवविच्छेदन करून त्यांच्या पार्थिवावर बोंडले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती,सासू,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
* ट्रकचालकास पाठलाग करुन पकडले
अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले. मद्यधुंद आसल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. प्रत्यक्षदर्शींनी प्रल्हाद देवराव जाधव व गावातील युवकांच्या सतर्कतेने त्याचा पाठलाग करून त्या ट्रकचालकास मालवाहतूक ट्रकसह माळशिरस येथे पकडले. प्रल्हाद जाधव यांच्या फिर्यादीवरून वेळापूर पोलिस ठाणे यांचेकडून पंचनामा केला. मालवाहू ट्रक ताब्यात घेऊन ट्रक चालक नबिसा लाडलेसाहब पटेल (वय ३५) व क्लिनर मल्लिकार्जुन भिमराव धोरे (वय ४२ रा.रामामोला शहाबाद ता.चितापूर जि.गुलबर्गा) या दोघाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.