बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावात कन्नडीगांचं संतापजनक कृत्य समोर आलं आहे. बेळगावातील एका गावातून चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौथ-यावरुन हटवण्यात आला आहे. मनगुत्ती गावातील शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. काल शुक्रवारी रात्री हा पुतळा काढण्यात आला आहे.
शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने शिवभक्तांमध्ये एकच संताप पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील शिवभक्त उद्या रविवारी कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाव कमी झाला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला आहे.
सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
पुतळा बसवण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचा आक्षेप घेत गावातील एका गटाने विरोध केला. त्यामुळे तणाव वाढला, त्यानंतर प्रशासन आणि पोलिसांनी रातोरात हटवला आहे.
त्यामुळे शिवप्रेमी आणि एका गटामध्ये तणाव वाढला, गावातील पुरुष आणि महिला चौथऱ्याजवळ येऊन “पुतळ्याला हात लावाल तर याद राखा” अशी भूमिका घेतली. तणाव वाढल्याने गावात स्थानिक प्रशासन आणि पोलीस दाखल झाले. गावात ८० टक्क्याहून जास्त मराठी बांधव असल्याने त्यांनी मूर्ती हटवण्यास विरोध केला. पुतळा बसवण्यासाठी पोलीस आणि तहसिलदारांची परवानगी नसल्याचं प्रशासनाने सांगितले. यानंतर ही मूर्ती प्लास्टिकने झाकण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी दोन्ही गटांना समोरासमोर बसवून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेल्याचेही सांगण्यात येतंय.