सोलापूर : वालचंद कॉलेजच्या बॉईज होस्टेल येथील महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमधील वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी पालिका आयुक्तांनी सेंटरवरील वैद्यकीय अधिकार्यांसह 8 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याप्रकरणी कारवाईचा प्रस्ताव असून मृत्यूसारख्या गंभीर प्रकरणातही फक्त विभागीय चौकशीची कारवाई प्रस्तावित होत असल्याचे वृत्त आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ सहज उपलब्ध होत नसल्याने संबंधितांवर निलंबनाची कारवाई उपयोगाची नसल्याची चर्चा आहे. निलंबित केले तर घरी बसून निम्मा पगार दिला जातो. त्यामुळे विभागीय चौकशी प्रस्तावित आहे. विभागीय चौकशी प्रकार खासगी झाला असल्याने या चौकशीला विलंब लागतो आणि घटनेचे गांभीर्य संपते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वालचंद कॉलेज येथील क्वारंटाईन सेंटरमधील दाखल करण्यात आलेल्या एका 68 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. या सेंटरवर कार्यरत असणार्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवकांची चिप्पा, डॉ. काजल कोडीटकर, नियंत्रण अधिकारी प्रताप फखरात, सनियंत्रण अधिकारी महेश क्षीरसागर, लिपिक भीम जन्मले, लिपिक अशोक म्हेत्रे, लिपिक सिद्धगोंडा जत्ती यांच्यासह वैद्यकीय अधिकारी वाय.एस. पल्लेलू यांना कर्तव्यामध्ये कसूर केल्या कारणाने कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती.
संबंधित अधिकारी, कर्मचार्यांनी खुलासे प्रशासनाला सादर केले असून प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. क्वारंटाईन सेंटरवर झालेल्या मृत्युच्या गंभीर प्रकरणात खरे तर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. पण दोषींवर विभागीय चौकशीची कारवाई प्रस्तावित केली जात असल्याची चर्चा पालिकेत सुरु आहे.