नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून पक्षामध्ये अध्यक्ष निवडीचा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जात आहे. सोनिया गांधी यांच्या हंगामी अध्यक्ष निवडीलाही लवकरच वर्ष पूर्ण होणार आहे. पक्ष लवकरच अध्यक्ष निवडण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल हा प्रश्न अनुत्तरित असून, काँग्रेसच्या नेत्यानं पक्षाला यावरून घरचा आहेर दिला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी एका ठिकाणी दिलेल्या एका मुलाखतीत काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. या मुलाखतीत काँग्रेस अध्यक्ष निवडीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते व्यक्त झाले.
“गांधी कुटुंबाच्या बलिदान, काम आणि ताकदीमुळेच सर्वांना वाटत की, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी आणि हे साहजिक आहे. यात चुकीचं काहीच नाही. पण त्यांना अध्यक्षपदावर यायचं नसेल, तर यावर लोकशाही पद्धतीनं तोडगा काढायला हवा. पण, खूप वेळ लागत आहे. राहुल गांधी एका वर्षापासून अध्यक्ष नाहीत, तरीही काँग्रेसचं काम सुरू आहे. सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष म्हणून काम करत आहेत,” असं सिंघवी म्हणाले.
“राहुल गांधी यांना अध्यक्ष व्हायचं नसेल, तर दुसऱ्या व्यक्तीची निवड करायला हवी,” अशा शब्दात काँग्रेसला सल्ला दिला आहे. “सोनिया गांधी यांना हंगामी अध्यक्ष होऊन वर्ष झालं आहे. काँग्रेसच्या नेतृत्त्वाबद्दलची अनिश्चितता कायम आहे. आतापण तुम्ही म्हणता की, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं, अभिषेक मनु सिंघवी अध्यक्ष का होऊ शकत नाही?,” असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले.
“सध्या आमची परिस्थिती वाईट आहे. पण, असं म्हणणं चुकीचं होईल की राहुल गांधी पुन्हा होऊ शकत नाही. आम्ही म्हणतो आहोत की, राहुल गांधी यांनी समोर यावं आणि त्यांना नाही यायचं, ही त्यांची इच्छा असेल, तर यावर निर्णय घेऊन नवीन अध्यक्ष निवडला जावा. ही अनिश्चितता राहायला नको. यामुळे नुकसान होऊ शकतं. काही आठवड्यांमध्ये यावर तोडगा निघेल. कुणीतरी अध्यक्ष होईलच आणि निवडणुकीच्या माध्यमातून होईल,” असं सिंघवी म्हणाले.