पुणे : दौंड तालुक्यातील राहू येथे आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे म्हशीची गर्भधारणा करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्भधारणा झालेल्या म्हशीला नुकतीच पारडे जन्माला आली आहेत. हा पहिलाच उपक्रम ‘जेकेबोवाजेनिक्स’ या ‘जेके ट्रस्ट’मधील स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने दुग्ध व्यावसायिक रामराव सोनवणे यांच्या फार्ममध्ये राबवण्यात आला आहे.
ही भारतातील पहिलीच घटना असून यासाठी असिस्टेड रिप्रॉडक्टीव्ह टेक्नॉलॉजीचा (एआरटी) वापर करण्यात आला आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात काम करत असलेल्या देशातील एका सामाजिक संस्थेने हा प्रयोग राबविला. सध्या देशभरात या संस्थेच्यावतीने गाई आणि म्हशी प्रजनन विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दौंड तालुक्यातील राहू गावाजवळील सोनवणे बफेलो फार्ममधील चार म्हशींची आयव्हीएफ तंत्राच्या माध्यमातून गर्भधारणा करण्यात आली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) तंत्रज्ञानाने म्हशीचं रेडकू जन्माला घालण्यामध्ये राज्यातील शास्त्रज्ञांना यश आलं आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू गावामधील सोनवणे फार्ममध्ये हा प्रयोग यशस्वी झाला. दुभत्या म्हशींच्या संख्येमध्ये वाढ करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. प्रयोगशाळेत म्हशीचा गर्भ वाढवून गर्भधारणा करण्याचा भारतातील हा पहिलाच प्रयोग आहे.
भारतात दुभती जनावरे व म्हशी यांच्या जातींचे संवर्धन करून त्यांची पैदास मोठ्या प्रमाणात करण्याचे पूरक तंत्रज्ञान विकसीत करण्याच्या उद्दिष्टाने ‘जेकेबोवाजेनिक्स’ची स्थापना ‘जेके ट्रस्ट’ने 2016 मध्ये केली. महाराष्ट्रातील पुण्याजवळील ‘कॅटल ईटी-आयव्हीएफ लॅब’मध्ये यशस्वी चाचण्या घेतल्यानंतर, भारतीय शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने संस्थेने प्रथमच चार ‘मोबाइल ईटी-आयव्हीएफ व्हॅन’ स्थापित केल्या. या व्हॅन्स शेतकऱ्यांच्या दारात प्रत्यक्ष नेण्यात येतात. त्यामुळे येणाऱ्या काळात दुग्ध क्रांती घडून येणार आहे.
* देशातील दूग्ध व्यवसाय वाढण्यास मदत
राष्ट्रीय गोकुळ योजनेंतेर्गत आयव्हीएफ तंत्राच्या माध्यमातून गाईंपासून वासरे जन्माला घालण्याचे काम ही संस्था पूर्वी करीत होती. आता असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने म्हशीचे पारडू जन्माला घालण्याचे काम संस्थेमार्फत सुरू करण्यात आले आहे. रेमंड समुहाच्या अख्त्यारितील जेकेबोवाजेनिक्स या संस्थेने हा प्रयोग सुरु केला आहे. यामुळे देशातील दूग्ध व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. दरम्यान, भारतात गोठलेल्या आयव्हीएफ भ्रूणापासून वासरू जन्माला घालण्याचा पहिला प्रयोग ९ जानेवारी २०१७ मध्ये करण्यात आला होता. यामुळे भारतात दुभती जनावरे आणि म्हशी यांच्या जातींचे संवर्धन करून त्यांची पैदास मोठ्या प्रमाणात करण्याचे पूरक तंत्रज्ञान विकसीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
“अशा प्रकारचा एकमेव उपक्रम असून यातून देशातील दुग्ध उत्पादन वाढण्यास मोठी मदत होऊ शकेल. आजच्या संदर्भात आपली देशी जनावरे आणि म्हशी यांच्या जातींचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या दुधात आजारांशी लढण्यासाठी उच्च पौष्टिक मूल्ये असतात.भारतात दुग्धजन्य उत्पादनांमध्ये वाढ झाल्याने खेड्यांमध्ये तळागाळात अधिक प्रगती होऊ शकेल”
– डॉ. श्याम झंवर, जेके ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी