जोधपूर : पाकिस्तानमधून आलेल्या एका स्थलांतरित कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह राजस्थानमधील एका गावात मिळाले आहेत. ही धक्कादायक घटना जोधपूरपासून जवळच असलेल्या देंचू भागातील लोडता गावामध्ये घडली आहे. मृतामध्ये सहा वयस्क आणि पाच बालकांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे एकूण १२ जणांचे कुटुंब होते त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमागील कारण आणखी समजू शकलेले नसून पोलिस पुढील तपास करत आहेत. पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू परिवारातील ११ सदस्यांचे मृतदेह राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील एका शेतात सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या परिवारातील एक सदस्या जिवंत असून तो मृतदेह आढळलेल्या झोपडीबाहेर पोलिसांना सापडला. मात्र त्याला या प्रकाराबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. लोडता गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नसलं तरीही सर्वांनी केमिकल सदृष्य पदार्थ पिऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे. झोपडीत शिरल्यानंतर सर्वत्र केमिकलचा वास येत होता, त्यावरुन हा प्राथमिक अंदाज बांधण्यात आल्याची माहिती जोधपूर ग्रामीण पोलिसांनी दिली. मृत्यू पावलेले सर्व निर्वासित हे पाकिस्तानमधील भिल्ल समाजाची लोकं होती, भारतात आल्यानंतर त्यांनी जोधपूरजवळ एका शेतात सर्व काम पाहण्याची जबाबदारी स्विकारली होती.
एकाही मृतदेहावर जखमा झाल्याचं निशाण, किंवा घातपात करुन मारल्याचं चिन्ह नाहीये. यासाठी फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन मृत्यूचं नेमकं कारण काय याचा तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितीवरुन या परिवारात काही कारणावरुन वाद सुरु होता असंही पोलिसांना समजलं आहे. या घटनेत बचावलेल्या एका व्यक्तीची चौकशी केल्यानंतर या प्रकरणावरचा पडदा उठण्यास मदत होईल, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली.