सांगली : रानभाज्या व सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या, फळे व अन्नधान्याचा दैनंदिन आहारात वापर गरजेचे बनले आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
शिराळा येथील मध्यवर्ती प्रशाकीय इमारतीत आज रविवारी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत रानभाजी महोत्सव झाला. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे, तालुक्याच्या सभापती वैशालीताई माने प्रमुख यांची उपस्थितीत होते.
नवीन पिढीला रानभाज्या समजाव्यात, त्यांचे आरोग्यातील महत्व समजावे यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार आजच्या ऑगस्ट क्रांती आणि जागतिक आदिवासी दिनी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
आमदार नाईक म्हणाले, रानभाज्या नैसर्गिक वाढलेल्या व विषमुक्त असतात. रानभाजी व सेंद्रिय भाजी आरोग्यासाठी उत्तम असते. रासायनिक खते व कीटकनाशके वापरलेल्या भाज्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. शिराळा तालुका डोंगराळ आहे. रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. अन्नधान्य, फळे, भाजीपाला संकरित व रासानिक औषध वापरून पिकवली जात आहेत. त्यामुळे कॅन्सर, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडाचे आदी रुग्ण वाढताना दिसत असल्याचे सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रारंभी आमदार नाईक यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचे फीत कापून उदघाटन झाले. उपस्थित मान्यवरांनी महोत्सवात ठेवण्यात आलेल्या करटोली, अंबाडी, घोळू, पातर, टाकळा, अळू, बिब्बा, शेवगा, चवळी, लाल माठ, तांदळ, चवळी, रुई, पिंपळ, तोंदली, गुळवेल, मायाळू, केना, बांबू कोंब आदी भाज्यांची पहाणी केली.
तालुका कृषी अधिकारी जी. एस. पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. कोकरूड मंडल कृषी अधिकारी ए. एन. शिंदे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. या वेळी शिराळा मंडल कृषी एस. टी. घारगे, रामचंद्र पाटील, प्रणव हसबनिस, संदीप पाटील, शेतकरी आदी उपस्थित होते.