सोलापूर : आंतरजातीय प्रेमविवाहाच्या रागातून मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथे जवानाच्या पित्याला झाडाला बांधून अमानुष मारहाण केली. पोलिसांनी धरपकड करुन दहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी व्हायरल झालेल्या क्लिपमधील १२ जणांवर गुन्हा दाखल केला असून १० आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींना मंगळवेढा न्यायालयात हजर केले असता सर्वांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. व्हायरल क्लिपमध्ये दिसत असलेल्या अन्य आरोपींचा शोध पोलिसांनी सुरूच ठेवला आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमधून इतर आरोपींना शोधण्याची मोहीमही वेगाने सुरू झाली असून सोलापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी गावात भेट देऊन अधिक माहिती घेतली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंगळवारी सकाळी ८ वाजता दामाजी बरकडे यांना त्यांच्या वस्तीवर जाऊन बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे हात बांधून ३ किलोमीटर धिंड काढून त्यांना गावात आणण्यात आले होते. यानंतर त्यांना गावात एका झाडाला बांधून पुन्हा गावकऱ्यांदेखत मारहाण करण्यात आली होती. यावेळी सगळे गावकरी समोर असूनही कोणीच त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. याची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने घटनास्थळी जात पोलिसांनी त्यांची सुटका केली.
यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली आणि १० आरोपींना तातडीने अटक करण्यात आली. यात गावातील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांसह मुलीच्या कुटुंबातील वडील, भाऊ , चुलते, चुलत भाऊ यांनाही मारहाण प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणातील एक महिला व एक अल्पवयीन मुलाचा पोलीस शोध घेत आहेत.
* फोन का केला म्हणून मारहाण
मुलाच्या वडिलांनी मुलीकडील मोठ्या जावयाला फोन करून मुलाकडे लक्ष देण्याची विनंती केली. मात्र तू आमच्या जावयाला फोन का केला, असा सवाल करीत मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या वडिलांना अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर त्यांचे हात बांधून त्यांना गावात आणण्यात आलं. तसेच गावात एका झाडाला बांधून त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. या प्रकरणामुळे बरकडे कुटुंब दहशतीखाली असून सैन्यदलात असणाऱ्या थोरल्या मुलाची पत्नी व तान्हे बाळ देखील घरात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. आपल्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका असल्याचे मुलाची आई सांगत असून आमचा मुलगा सीमेवर रक्षण करतोय, आमचे रक्षण पोलिसांनी करावे, अशी मागणी त्या करीत आहेत.