औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कौटुंबिक त्रासाला कंटाळून घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. कुटुंब न्यायालयात संजना जाधव यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती हर्षवर्धन जाधवांनी दिली.
भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा जावई म्हणून मला कुणीही संबोधू नका, अशी विनंतीही हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. पत्नी संजना जाधव यांच्याशी घटस्फोटाची प्रक्रिया सुरु केली असल्याचेही जाधवांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कौटुंबिक त्रासाला कंटाळलो आहोत, रावसाहेब दानवे यांच्यामुळेही त्रस्त झाल्यामुळे घटस्फोटाचा निर्णय घेतल्याची माहिती हर्षवर्धन जाधव यांनी दिली. आपल्या जीवाला धोका असल्याचा पुन्हा उल्लेख हर्षवर्धन जाधव यांनी केला. “रावसाहेब दानवे यांच्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. त्यांनी माझ्याविरोधात अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करुन घेतला. त्यांच्या त्रासामुळे मी अंतूर किल्ल्यावर आत्महत्या करण्यासाठी गेलो होतो”, असे गंभीर आरोपही हर्षवर्धन जाधव यांनी केले होते.
हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेत आपल्या पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. हर्षवर्धन जाधव दोन वेळा कन्नडचे आमदार राहिले आहेत. रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे दोघे मिळून आपल्याला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. “रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी ‘हर्षवर्धन वेडा आहे’ हे सिद्ध करायचा विडा उचलला आहे. एकदा हे सिद्ध झालं तर मग तो काहीही बोलला तरी फरक पडणार नाही, असं त्यांचं षडयंत्र सुरु आहे”, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता.