सोलापूर : पत्नी आणि मुलीची छेड काढणाऱ्या सालगड्याचा शेतमालकानेच खून केला आहे. पत्नीची वारंवार छेड काढत असल्याच्या रागातून चिडलेल्या बाप-लेकासह तीन जणांनी सालगड्याचा वायरने गळा आवळून खून केला. या तिघांना अटक केली आहे. ही घटना बार्शी तालुक्यातील पांगरी परिसरात घडली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उत्तम नारायण कांबळे असं खून झालेल्या सालगड्याचं नाव आहे. तर शिवाजी बोकेफोडे आणि रवी बोकेफोडे तसंच सालगड्याचा चुलत मेहुणा आबा उर्फ राहुल उद्धव माने असं आरोपींची नावे आहेत. रात्री कामानिमित्त बाहेर बोलावून नेऊन सालगड्याचा गळा आवळून खून केला.
उत्तम कांबळे याचा वायरने गळा आवळून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह पांगरी शिवारातील जैनुद्दिन शेख यांच्या विहिरीत टाकला होता. मात्र मृताची ओळख पटत नव्हती. वैराग पोलिसांनी आसपासच्या परिसरातील बेपत्ता तक्रारींची तपासणी केली असता उत्तम कांबळे बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.
मृत उत्तम कांबळे हा गावातील शिवाजी बोकेफोडे यांच्याकडे सालगडी म्हणून होता. त्यावेळी मालक आणि कांबळे यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मासे पकडण्यासाठी चल असे सांगून आरोपींनी त्याला घरातून घेऊन गेले. मात्र त्या रात्रीनंतर तो घरी परतलाच नाही. त्यामुळे संशय आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शेतमालक शिवाजी बोकेफोडे याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर मात्र आपणच त्याचा खून केल्याचे आरोपी शिवाजी बोकेफोडे याने कबूल केले.