मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थआनी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि शरद पवारांची कन्या सुप्रीया सुळेही या बैठकीला उपस्थित होत्या.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी शरद पवार यांनी उघडपणे नातू पार्थ पवारला फटकारल्यानंतर अजित पवार हे बुधवारी तातडीने शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले होते. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा चालली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी उशिरा पवार शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पवार कुटुंबात एक नवा वाद उफाळून आला आहे. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर अपरिपक्व म्हटलं होतं. तसेच, आम्ही पार्थच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही, असंही शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
पार्थ पवार हे मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. पवार कुटुंबात वाद उद्भवल्याची चर्चा होताच खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थीची भूमिका घेत पार्थ पवारांना थेट शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर बोलावून घेतले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राष्ट्रावादीच्या घडामोडींमध्ये सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची आहे. काल संध्याकाळी सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. त्याचबरोबर आज सुप्रिया सुळे यांनी वायसीएमआर प्रतिष्ठान येथे अगोदर शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी पार्थ पवार सुप्रिया यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे हे प्रकरण निवळण्यात सुप्रिया यांची भूमिका महत्त्वाची आहे.
पार्थ पवार राम मंदिर आणि सुशांत प्रकरणाबाबत घेतलेल्या भूमिकांवर शरद पवारांकडे माफी मागू शकतात किंवा ते बंड पुकारु शकतात. दरम्यान, भेटीतून, समोपचारातून प्रकरण थांबावं, असे प्रयत्न केले जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या भेटीनंतर पार्थ पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सायंकाळी आजोबा शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली. तब्बल सव्वादोन तास ते त्या ठिकाणी होते. सुमारे पावणे दहाच्या सुमारास ते सिल्व्हर ओकमधून बाहेर पडले. या भेटीबाबत त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.