मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी कोरोनाने शिरकाव केला आहे. ‘सिल्व्हर ओक’ येथील पाच जणांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये सुरक्षारक्षक आणि महिला स्वयंपाकीचा समावेश आहे. यानंतर शरद पवार यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असून अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शरद पवार यांना राज्यात फिरु नका, अशी विनंती करणार असल्याचं राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सिल्व्हर ओकमधील दोन लोक आणि सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्यांपैकी तीन लोक पॉझिटिव्ह सापडले आहेत. संसर्ग झालेले सुरक्षारक्षक बऱ्याचदा लोकांना शरद पवारांपासून दूर करण्याचं काम करत असतात. त्यातून त्यांना लागण झाली असल्याची शक्यता आहे”.
“दरम्यान शरद पवार यांची रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात चाचणी करण्यात आली. त्यांना काहीही समस्या नाही. ते अत्यंत सुरक्षित आहेत,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. आपण त्यांना राज्यात फिरु नका अशी विनंती करणार असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
“सुरक्षारक्षक आणि महिला स्वयंपाकी यांच्या घरातील तसंच ज्या चाळीत राहतात तेथील लोकांची चाचणी केली जाणार आहे. त्यांची पूर्ण काळजी घेतली जात आहे. प्रोटोकॉलप्रमाणे सर्व गोष्टी केल्या जात आहेत,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. पवार साहेबांच्या निवासस्थानातील बाधित कर्मचारी ज्या ठिकाणी राहतात, तेथील चाळीतील रहिवाशांचं अँटिजेन व अन्य तपासण्या करण्यात येत आहेत. त्या कर्मचाऱ्यांची काळजीही नियमानुसार घेतली जात आहे, असंही टोपे यांनी सांगितलं.
शरद पवार हे महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. आम्ही त्यांना नेहमीच काळजी घेण्याबद्दल सांगत असतो. पण त्यांचा उत्साह मोठा आहे. लोकांच्या प्रती त्यांची बांधिलकी आहे. त्यातून ते लोकांमध्ये जात असतात. कदाचित फिरण्यातून त्यांना काही संदेश द्यायचे असतात. त्या सर्व अनुभवांतून जाण्याचा ते आवर्जून प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते स्वतःही काळजी घेत असून चिंता करण्याचे कारण नाही,’ असेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.