सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असल्याने यंदा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांसाठी नियमावली दिली असून यंदा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारून गणेश स्थापना करता येणार नाही. याशिवाय घरगुती अथवा मंडळांच्या बाप्पाचे सार्वजनिक ठिकाणी विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गणेश मंडळातील मूर्ती या चार फुटापेक्षा लहान असाव्यात असे बंधन घालण्यात आले असून मूर्ती स्थापना व विसर्जनास कोणत्याही पद्धतीची मिरवणूक काढण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यंदा रस्त्यावर मंडप मारून बाप्पाच्या मूर्ती विकण्यास मज्जाव करण्यात आला असून नागरिकांनी ऑनलाईन बुकिंग खरेदी किंवा मूर्तीकारांच्या कारखान्यातून खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.
शिवाय कायमस्वरूपी असलेली मंदिरे, पारंपरिक मंडप आणि गेल्यावर्षी परवानगी काढलेल्या मंडळांना नियम आणि अटींचे पालन करून गणेश मूर्ती स्थापनेस परवानगी दिली जाणार असल्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर आणि जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले आहे. मराठी सनातील प्रमुख असलेला बाप्पा विघ्नहर्ता म्हटले जाते. मात्र यंदा बाप्पाच्या वाटेत कोरोनाचे विघ्न उभे ठाकले आहे.
यंदाच्या गणेश आगमन आणि विसर्जनावेळीची बहारदार लेझीम खेळ पाहवयास मिळणार नाही.
सोलापूरकर ते यंदा मिस करणार आहेत. गणेश उत्सव काळात प्रत्येक मंडळ चढाओढीने बहारदार लेझीम खेळ सादर करतात. ते पाहून अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटतात. तो खेळ पाहण्यास यंदा गणेश भक्तांना मुकावे लागणार.
यंदा नवीन मंडळास ऑफलाईन किंवा ऑनलाईन परवानगी मिळणार नाही. 2019 साली ज्या मंडळांनी परवानगी काढली आहे त्यांना परवानगी दिली असली तरी त्यासाठी रस्त्यावर मंडप, स्टेज टाकता येणार नाही. गणेशमूर्तींच्या आरतीसाठी 10 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित येता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून गणेश उत्सव साजरा करावा लागणार आहे. घरगुती बाप्पांचे आपल्या घरीच तर गणेश मंडळांना त्याच जागी मूर्तीचे विसर्जन करावे लागणार आहे.
* गणेश मंडळांना नव्याने परवानगी नाही
सर्वांच्या आनंदाचा उत्सव असणार्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गणेशमूर्ती स्थापनेला तसेच मिरवणुकीला जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध घातला असून नव्याने कोणत्याही मंडळाला परवाना दिला जाणार नाही. ज्या मंडळांकडे 2019 मध्ये परवाना काढला आहे. त्यांनाच वस्तुस्थितीचा विचार करून परवानगी देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा डॉल्बी, झांज, ढोलसह निघणार्या मिरवणुकाच नसल्याने गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे.