नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काल सोमवारी रात्री एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील माहिती एम्स रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंंत्रालयाने याबाबत पत्रक प्रसिद्ध करत माहिती दिली आहे. शाह यांची प्रकृती स्थिर असुन त्यांंना खबरदारी म्हणुन हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आल्याचे सुद्धा या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
अमित शहा यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. पण उपचारानंतर नुकतीच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. आता दोन दिवसांपासुन शाह यांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना निरिक्षणासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इथे तज्ञ डॉक्टरांंच्या देखरेखीखाली शाह यांच्यावर उपचार सुरु आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एम्सचे अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरीया यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. अमित शहा यांची प्रकृती ठिक असून ते रुग्णालयातून आपले काम पाहणार असल्याची माहितीही रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. २ ऑगस्ट रोजी अमित शहा यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विट करुन दिली होती. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे अमित शहा यांनी त्यावेळी सांगितले होते.
अमित शहा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेदांता रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी अमित शहा यांनी संपर्कात आलेल्यांना स्वत:चं विलगीकरण तसेच चाचणी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी त्यांनी आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती दिली होती. तसेच डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढचे काही दिवस मी स्वतःला होम क्वारंटाइन करणार असल्याचे शहा यांनी सांगितले होते.