सोलापूर : कर्ज घेतलेली रक्कम आणि व्याजाचे मिळून दोन लाखांची मागणी करत तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास अण्णासाहेब पाटील शाळेजवळ घडली. यातील गुन्हा दाखल झालेला एक सावकार राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे.
यात सावकार नगरसेवक किसन जाधवसह तन्मेश गायकवाड, तेजस गायकवाड, प्रेम नागेश गायकवाड, शुभम मरगु गायकवाड (सर्व रा. सोलापूर ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण सिद्राम जाधव (वय-20 रा, न्यू हायस्कूल शाळेजवळ सलगरवाडी, सोलापूर) याने सहा महिन्यांपूर्वी कपडे विक्रीच्या व्यवसायाकरिता किसन जाधव याच्याकडून 50 हजार रुपये दहा टक्के प्रतिमहिना व्याजदराने घेतले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
परंतु लॉकडाऊनमुळे कपड्याचा व्यवसाय न झाल्याने घेतलेली रक्कम देता आली नाही. त्यावेळी किसन जाधव याने प्रवीण यांच्याकडे जाऊन कर्ज घेतलेले 50 हजार रुपये व त्यावरील व्याज असे मिळून दोन लाखांची मागणी केली. दरम्यान प्रवीण यांनी किसन जाधव यांना साडीचा व्यवसाय बंद असल्याने पैसे नसल्याचे सांगत नंतर देण्याचे कबूल केले.
त्यावेळी किसन जाधव यांनी प्रवीण यांना मी काय करू, तुला माहित आहे ना, मी कोण आहे ते अस म्हणत दमदाटी केली. त्यानंतर प्रवीण आणि त्यांचा मित्र हे अण्णासाहेब पाटील शाळेजवळून रिक्षात बसून जात असताना किसन जाधव याने त्यांना पैसे मागण्याचा पुन्हा तगादा लावत तन्मेश गायकवाड, तेजस गायकवाड, प्रेम नागेश गायकवाड, शुभम मरगु गायकवाड यांना सोबत घेत लोखंडी रॉड, हॉकी स्टिक व बॅटने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत प्रवीण जाधव यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास स.पो. नि. भुसनुर करीत आहेत.